कला क्षेत्रातील मंडळींनी सहभागाचे आवाहन
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात येत्या शनिवारी (दि. 26) सायंकाळी 4.30 वाजता मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कला क्षेत्रातील मंडळींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नाट्यचळवळ वृद्धींगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा अविरतपणे पुढे चालत राहावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला.
नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. देखणे व नेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली. यंदा या स्पर्धेचे सातवे वर्ष असून, ही स्पर्धा जानेवारी 2021च्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. या स्पर्धेचा जास्तीत जास्त रसिकांना व्हावा यासाठी कला क्षेत्रातील मंडळींनी नियोजनात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.