ऐन लोकसभा निवडणुकीतच भाजपने राष्ट्रवादीच्या ताब्यातील अकलूजची गढी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे आता माढ्यावर सहजपणे चाल करणे शक्य होणार आहे. गढीच्या सेनापतीचाच सुपुत्र ताब्यात आल्याने सेनापतीही आता भाजपत येण्यास विलंब लागणार नाही. त्यांच्या आगमनाने सोलापूरसह माढ्यावरही आता भाजपचाच विजय राहणार आहे.
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून होळी आणि धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे. समाजातील, व्यक्तिगत जीवनातील आरिष्ट, नैराश्य टळावे आणि सुखी जीवन व्हावे यासाठी होळीला अग्नी देण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. या होळीनंतरच खर्या अर्थाने वसंत ऋतूला प्रारंभ होतो, असे म्हणतात. धरती आपले रूप बदलू लागते. यंदाही अशीच धामधूम राज्यात सुरू आहे. या वेळच्या होळी आणि धूळवडीला राजकारणाची मोठी झलक लाभली आहे. देशात सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. यामुळे यंदाच्या होळी आणि धूळवडीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. याच होळीच्या सणाचा मुहूर्त साधत महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपने विजयाचे रंग उधळण्यास सुरुवात केली आहे, तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार शिमगा निर्माण झाला आहे. निमित्त तसेच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे तालेवार नेते अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्याचा वारसदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ फेकून देत विकासाचे कमळ हाती घेतले आहे. मोहिते-पाटील यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपने गेल्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील बडे प्रस्थ असलेल्या विखे-पाटील परिवाराच्या वारसदारालाच आपल्याकडे घेतले आहे. त्या धक्क्यातून काँग्रेस सावरत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीलाही असाच धक्का मोहिते-पाटील यांच्या रूपाने देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचे रंग आतापासूनच उधळण्यास सुरुवात केली आहे. मोहिते-पाटील यांची तिसरी पिढी राज्याच्या राजकारणात नेहमीच सक्रिय राहिलेली आहे.सोलापूर जिल्हा हा मोहित्यांचा बालेकिल्ला. सहकार, शिक्षण, कृषी आदी क्षेत्रांत मोहित्यांची नेहमीच मक्तेदारी राहिलेली आहे. त्यामुळे ते ज्या पक्षात असतात तेथे त्या पक्षाची सत्ता राहते हा अनुभव सोलापूरकरांनी घेतला आहे. रणजितसिंहांचे वडील विजयसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीचे बडे नेते. विद्यमान खासदार म्हणूनही ते कार्यरत आहेत, पण त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने केला. परिसराचा विकास हेतुतः लांबविला. याच प्रकाराला कंटाळून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भविष्याचा विचार करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्धार करीत त्याची तातडीने अंमलबजावणी देखील केली. त्यांच्या पक्षप्रवेशाने पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे प्राबल्य निश्चितच वाढणार आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्याच बालेकिल्ल्याला सुरूंग लावून त्यामधून अकलुजची गढी सर करण्यात मुख्यमंत्री फडणवीस यशस्वी झालेले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांनी भाजपला या वेळी सोलापूरबरोबरच माढा लोकसभा मतदारसंघात घवघवीत यश संपादित करणे शक्य होणार आहे. रणजितसिंहांच्या राजकीय कारकिर्दीला शुभेच्छा!