ऐतिहासिक आणि शिवकालीन महत्त्व असलेल्या पोलादपूर तालुक्याचे जात आणि व्यवसायदृष्टया फारच कमी भेद आढळून येत आहेत. यामध्ये मराठा, कुणबी आणि महादेव कोळी या तीन जातींची व्याप्ती लक्षणीय असून या तीनही जातींमध्ये रोटी-बेटी व्यवहार पुर्वापार सुरू आहेत. अलिकडे, आरक्षणाच्या मुद्दयांवरून मराठा अग्रेसर आहेत तर कुणबी इतर मागासवर्गीय म्हणून आरक्षणाच्या प्रतिक्षेत आहेत. या उप्पर महादेव कोळी समाज अजूनही आरक्षण मिळेल अथवा नाही यापेक्षाही जातीचा आणि जातपडताळणीचा दाखला मिळेल अथवा कसे, या विवंचनेमध्ये दिसून येत आहे. पोलादपूर तालुक्यातील महादेव कोळी समाजबांधवांपैकी काहींना 1980 पूर्वी तहसीलदारांकडून जातीचे दाखले मिळाले आहेत. मात्र, त्यानंतर आता नव्याने प्रांताधिकारी कार्यालयामार्फत जातीचे दाखले मिळत नसल्याने तालुक्यातील 21 गावांमध्ये विखुरलेला हा मागास समाज अद्याप जातीच्या दाखल्यांपासून वंचित राहिला असल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. पोलादपूर तालुक्यातील करंजे येथील काही महादेव कोळी समाजाच्या लोकांना 1980 पूर्वी पोलादपूर तहसिलदार तथा एक्झिक्युटीव्ह मॅजिस्ट्रेट यांच्या सहीशिक्क्यानिशी जातीचे दाखले देण्यात आले आहेत. यासंदर्भात पूर्वी कुलाबा जिल्हाधिकारी यांनी 3 जून 1967 रोजी कुलाबा जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, अलिबाग, महाड व सुधागड या तालुक्यांतील महादेव कोळी व डोंगर कोळी यांनाच अनुसुचित जमात म्हणून मान्यता दिल्याचे निर्देश देताना इतर तालुक्यातील लोकांस तशी मान्यता मिळालेली नसल्याचे सूचित करणारे पत्र पेण तहसीलदारांना उद्देश्यून असून या पत्राची प्रत तजविजीसाठी महालकरी पोलादपूर यांना माहितीसाठी पाठविली आहे. हे निर्देश राज्य सरकारच्या शिक्षण आणि समाजकल्याण विभागाच्या 1101962 च्या परिपत्रकानुसार तसेच समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा आणि पर्यटन विभागाच्या 2931972च्या परिपत्रकानुसार जातीचे दाखले देण्यासंदर्भात कायम असल्याचा उल्लेख असलेल्या परिपत्रकांच्या आधारे देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात म्हसळा पंचायत समितीचे तत्कालीन उपसभापती एस. डी. शिंदे यांना राज्यसरकारच्या याच समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा आणि पर्यटन विभागामार्फत केंद्रशासनाच्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती सुधारणा कायदा 1976 अन्वये 27 जुलै 1977 पासून महादेव कोळी किंवा डोंगर कोळी संबंधातील क्षेत्रबंधन दूर करण्यात आल्यानुसार म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील या जमातीचे लोक अनुसूचित जमातीचे म्हणून मानले जातील, या संबंधात सर्व अधिकार्यांना सूचना देण्यात आल्याचे 14 डिसेंबर 1978च्या पत्रान्वये कळविण्यात आले असल्याचा संदर्भ आढळून आला आहे. आदिवासी विकास मंत्रालयाने 14 जानेवारी 1999 च्या परिपत्रकानुसार अनुसुचित जमातीतील ’कोळी महादेव’ या जमातीला जातीचे दाखले देण्याबाबतचा खुलासा तयार केला असून यानुसार क्षेत्रबंधने उठविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये अनुसूचित जमातीच्या कुटूंबांना ते शहरात अथवा मूळ गावापासून दूर राहू लागल्याने जमातीच्या चालीरिती, व्रतवैकल्ये, सण इत्यादींची माहिती नसल्याने या कारणास्तव त्यांना अग्राह्य ठरविणे चुकीचे होईल, असे स्पष्ट करताना अर्जदारांचे अर्ज का नाकारले याची कारणे व दिलेला प्रत्येक पुरावा अग्राह्य का वाटतो याबद्दलही आदेशात नोंद नमूद करायचे आदेश सक्षम अधिकार्यांना दिले आहेत. पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील सरपंचपदावरील रमेश नारायण गायकवाड यांना या समाजाचे असूनही जातपडताळणीवेळी अपात्र ठरविले गेल्याने 2009 साली अडीच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर पायउतार व्हावे लागले होते तर अलिकडेच या समाजाच्या दाभिळ येथील एका तरूणाला महादेव कोळी अनुसूचित जमातीचा दाखला जातपडताळणीवेळी ग्राह्य झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे, मात्र या दोन घटना परस्परविरोधी असूनही एकाच समाजासंदर्भात आहेत. यामुळे सक्षम अधिकारीदेखील महादेव कोळी या अनुसूचित जमातीबाबत जातीचा दाखला देण्याबाबतचा अर्जही स्विकारताना अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, अर्ज स्विकारलाच गेला नाही तर कोणत्या कारणास्तव नाकारला, यासंदर्भातील मत व्यक्त करण्याच्या कचाट्यातून या अधिकार्यांना सुटता येत आहे. परिणामी, पोलादपूर तालुक्यातील सुमारे उमरठ, दाभिळ, करंजे अशा सुमारे 21 गावांतील महादेव कोळी समाजबांधवांना जातीचे दाखले मिळत नाहीत. कोकणातील मुरा म्हणजे उंचावरील सपाटप्रदेश असलेला भूभाग. याठिकाणी अतिशय पुरातन असे महादेवाचे मंदिर असल्याने या गावाला महादेवाचा मुरा हे असे नाव पडले आहे. हे गाव बोरघर आणि गोवले या दोन ग्रामपंचायतींमध्ये विभागले गेले आहे. या गावातील समोरासमोरील 40 घरांच्या रांगा अशा प्रकारे दोन वेगवेगळया ग्रामपंचायतींमध्ये विभागल्याने या गावाला महसुली गावाचाही दर्जा मिळाला नाही. ब्रिटीश काळात या लोकवस्तीचा उल्लेख आदिवासी पाडा असा करण्यात आल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला महाबळेश्वरचा ऑर्थर सीट पॉईंट, दुसर्या बाजूला कांगोरीगड आणि समोरच चंद्रगड तर नजरेच्या टापूत शिवछत्रपतींनी रूधीर तिलक लावून हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतलेला रायरेश्वर मंदिराचा पाडाही दिसून येतो. काश्मीरमधील पहेलगामप्रमाणे बशीसारख्या या खोलगट भुभागात स्वच्छ सुर्यप्रकाश असताना सर्वच इतिहास अगदी साद घालताना दिसून येतो. उन्हाळ्यात तब्बल दोन-अडीच किमी पायपीट करून पाणी आणणार्या महिलांचा संसार अद्याप चुली कुंफ्कूनच चालला आहे. या गावाकडे गोवेले गावाकडून असलेला रस्ता सर्वात जवळचा रस्ता असल्याने तो 2009 साली करण्यात आला. या वेळी रस्त्यामुळे पाणीटंचाईकाळात येणार्या पिकअपजीपची वाट पाहणारे आबालवृध्द सुखावले जात असत. अंगणवाडी, प्राथमिक शाळा येथून शिकलेली मुलं साखर आणि उमरठ येथील माध्यमिक शाळांमध्येही जात आता महाबळेश्वर, पाचगणी यासारख्या ठिकाणी नोकरीनिमित्त गेली आहेत. या पाड्यावरील पारधी, सावंत, बुडले, कदम, झुंजार, वाघमारे, कोलपे, धानावले, टेकावले आदी आडनावाचे ग्रामस्थ पूर्वापार महादेव कोळी समाजाचे असूनही नोकरी उपजिविकेसाठी अन्यत्र स्थलांतरीत झाल्याने त्यांच्याकडे महादेव कोळी आदिवासी समाजाचे जातीचे दाखलेही नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे आदिवासींप्रमाणे या लोकवस्तीला रेशन धान्याचेही वाटप होत नाही. स्थानिक उपजिविका चक्क जंगलातील फळे विशेषत आंबे, फणस, काजू, बोरं, मध, वनौषधी विकून चालत आहे. या पाडयावरील सर्वाधिक वयोवृध्द महिला 98 वर्षांची असून दात आणि आवाज शाबूत असलेली ठणठणीत प्रकृतीची आहे. साधारणपणे 350 ते 400 लोकसंख्या असलेल्या या महादेवाच्या मुरा लोकवस्तीमध्ये पशूधनही तब्बल तीनशेच्या आसपास आहे. अविकसित गावाचा विकास ही राजकीय पुढारी आणि ठेकेदारांच्या उत्कर्षाचे साधन असते त्यास महादेवाचा मुरादेखील अपवाद राहिला नाही. येथे असलेल्या पावणेदोनशे मतदारांपैकी काहींना मतदानासाठी बोरघरला तर काहींना गोवेले येथे जावे लागत असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदानाला महादेवाचा मुरा उतरायचाच नाही, असा ठाम निर्धार महादेवाच्या मुरा येथील स्त्री-पुरूष मतदारांनी केला असता प्रशासनाला या इशार्याची दखल घ्यावी लागली होती. अद्याप या गावाला आदिवासी महसुली गावाचा दर्जा मिळाला नसून हे गांव बोरघर आणि गोवेले या दोन ग्रामपंचायतींमध्ये विभागलेले दिसून येत आहे.
-शैलेश पालकर
Check Also
पर्यावरण असंतुलनामुळे द्रोणागिरी डोंगराला धोका
संरक्षणासाठी ठोस पावले उचला; आमदार महेश बालदी यांची ‘लक्षवेधी’ पनवेल : रामप्रहर वृत्तउरणमधील ऐतिहासिक आणि …
RamPrahar – The Panvel Daily Paper