वैश्विक महामारी कोरोनामुळे मानवी जीवन पार बदलून गेले आहे. कोविड-19 विषाणूबद्दलची नागरिकांमधील दहशत चार महिन्यांनंतर काही प्रमाणात कमी झाली असली तरी धोका अद्याप कायम आहे. त्यामुळेच अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू होऊनदेखील जनजीवन पूर्णपणे सुरळीत झालेले नाही. अशा या आपत्तीमध्ये फार कमी लोकप्रतिनिधी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी कार्यरत आहेत. त्यामध्ये पनवेलचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.
आमदार प्रशांत ठाकूर यांची नाळ लहानपणापासूनच जनतेशी जोडली गेलेली आहे. वडील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून समाजकारणाचे बाळकडू मिळाल्यानंतर त्यांनी हा वारसा पुढे चालविण्याचा निर्धार केला आणि वडिलांप्रमाणेच सचोटी, परिश्रम व दूरदृष्टीच्या जोरावर अल्पावधीतच आपला वेगळा ठसा उमटविला. यशाची धुंदी चढली की अनेक जण स्वत:मध्ये गुंतले जाऊन मूळ उद्देशाला हरताळ फासतात. याउलट आमदार प्रशांत ठाकूर प्रत्येक यशागणिक अधिक जबाबदारीने काम करताना दिसून येतात. दररोज ते अनेकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत असल्याने तसेच विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याने दिवसभर व्यस्त असतात. त्यांचा दिवस सकाळी लवकर सुरू होतो आणि रात्री उशिरा संपतो. सध्या कोरोनाच्या काळात प्रत्येकाची प्रत्यक्ष भेट घेणे शक्य नसले तरी फोन, सोशल मीडिया या माध्यमातून ते सदैव उपलब्ध असतात, शिवाय त्यांचे दौरे सुरूच आहेत, परंतु एवढे दमूनसुद्धा दुसर्या दिवशी ते नव्या जोमाने सज्ज असतात.
आमदार प्रशांत ठाकूर यांचा एक गुण सर्वांत भावतो तो म्हणजे त्यांचा साधेपणा. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला हा नेता साधी राहणी व उच्च विचारसरणी अंगीकारतो. ना कुठला डामडौल ना बडेजाव. सहज, साध्या पद्धतीने पण आत्मविश्वासाने ते वावरत असतात. त्यांच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा स्पष्टपणा. जे काही करायचे, बोलायचे ते कुठलाही आडपडदा न ठेवता समोरच्यापुढे मांडतात. उगाच इतर पुढार्यांप्रमाणे पूर्ण न होणारे आश्वासन द्यायचे किंवा खोटी आशा लावून झुलवत ठेवायचे हे त्यांच्या गावी नाही. त्यामुळे कधी-कधी त्यांचे वैयक्तिक नुकसानही होत असेल, पण म्हणून कुणाची फसवणूक करणे त्यांना जमत वा पटत नाही. त्यामुळेच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात.
कोरोना संसर्गाच्या काळात आमदार प्रशांत ठाकूर स्वत:सोबतच इतरांची काळजी घेऊन काम करताना पाहावयास मिळतात. लॉकडाऊनमध्ये पनवेल परिसरातील गोरगरिबांची उपासमार होऊ नये यासाठी त्यांनी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने असंख्य गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याचबरोबर मोदी भोजन कम्युनिटी किचन नामक अन्नछत्रे उभारून भुकेल्यांच्या पोटाची खळगी भरण्याचे पुण्यकर्म केले. विशेष म्हणजे 50 लाख रुपयांचा आमदार निधी त्यांनी पीपीई किट खरेदीसाठी पनवेल महानगरपालिकेला दिला. याशिवाय त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे नगरसेवक, जि. प. व पं. स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपापल्या परिसरातील नागरिकांना रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्या गोळ्या, सॅनिटायझर, मास्क यांचे वाटप केले, तर युवा मोर्चाच्या तरुण शिलेदारांनी रक्तदान शिबिरे, स्वस्त दरात भाजीपाला घरात, प्रवासी पास काढून देणे आदी उपक्रम राबवून जनतेला दिलासा दिला.
कोरोनामुळे वारंवार लागू करण्यात येणार्या लॉकडाऊनने नागरिकांची गैरसोय होऊ लागली होती. त्यामुळे निर्माण होणार्या जनतेच्या प्रश्नांवर जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनदरबारी आवाज उठविला. दुसरीकडे कोरोनाचे भय न बाळगता रुग्णालये, क्वारंटाइन सेंटर येथे स्वत: भेट देऊन रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. अशा प्रकारे हा संवेदनशील नेता कोरोना योद्धा बनून सर्व घटकांना शक्य ते सहकार्य करून विपरीत परिस्थितीत मोलाची साथ देत आहे.
जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून आमदार प्रशांत ठाकूर वाटचाल करीत आहेत. त्यांच्या हातून जनसेवेचा वसा उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जाईल यात तीळमात्र शंका नाही. त्यासाठी या जननायकास उज्ज्वल भवितव्य आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो ह्या वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)