पनवेल : वार्ताहर
नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्रभागातील नागरिकांसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत असतात. याच अनुषंगाने प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आजच्या जीवनात आधुनिक तंत्रज्ञान, कॉम्प्युटर, इंटरनेट आणि स्मार्ट फोन यांच्या माध्यमातून घरबसल्या सर्व व्यवहार शिकून ज्येष्ठ नागरिक स्वतः आत्मनिर्भर होऊ शकतात. या एका विचाराने नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुवर्ण तेंडुलकर यांनी ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद साधून या सर्व उपक्रमाची विस्तृत माहिती दिली. सर्वांना या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्यवस्थित मिळावी यासाठी छोटे ग्रुप तयार करून प्रशिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठांनी स्वतःहून प्रशिक्षण वर्गाला नावे नोंदवली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले. नगरसेवक विक्रांत पाटील विकासकामांच्या बरोबरच प्रभागातील नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांची आपुलकीने काळजी घेतात याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.