Breaking News

अवकाळीने वीटभट्टींचे कोट्यवधींचे नुकसान

कच्चा माल तुटला; भट्ट्या कोलमडल्या

मोहोपाडा ः प्रतिनिधी
गेले काही दिवस अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असतानाच दोन-तीन तास मुसळधार पडलेल्या पावसामुळे वीटभट्टी चालकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. पावसामुळे वीटभट्टीवरील कच्चा माल तुटून पडला आहे, तर लावलेल्या भट्ट्या कोलमडल्या आहेत.एकीकडे रॉयल्टीसाठी शासन तगादा लावत असताना दुसरीकडे सिमेंट ब्लॉकमुळे पारंपरिक मातीवीट व्यवसाय संकटात सापडलेला होता. आता अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे केले आहे. नवीन घर घेणं असो कि ती उभं करणं त्यासाठी विटांची महत्वाची भूमिका असते. विटांशिवाय घराच्या भिंती उभ्या राहत नाहीत. वीट निर्मितीसाठी आजही पारंपारिक पद्धत वापरली जाते. कच्ची मातीची साच्यात बनवलेली वित्त दगडी कोळशाची भट्टी लावून भाजली जाते. त्यानंतर भट्टीतून टणक बनलेली वीट बांधकामासाठी वापरली जाते. तालुक्यात 500 च्यावर असलेल्या वीटभट्टींवर पावसाने अवकृपा केली आहे. त्यामुळे वीटभट्टी मजुरांनी बनवून वाळवायला ठेवलेला कच्चा माल तुटून पडला आहे, तर उघड्यावर ठेवलेला कोळसा भिजला आहे. त्याचबरोबर लावलेल्या भट्ट्या देखील काही ठिकाणी कोलमडल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात सर्व वीटभट्टी चालकांचे मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसाच्या भीतीने काही ठिकाणी वीटभट्टी चालकांनी भट्टीवर प्लस्टिक आवरण टाकून झाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तायतही नुकसानीपासून सुटका झालेली नाही.

माझ्या भट्टीवर किमान 25 हजार कच्ची वीट तुटून पडली आहे. कोळसा भिजला आहे. हे नुकसान माझे मलाच सहन करायचे आहे कारण शासन फक्त रॉयल्टी बघते. वीटभट्टी चालकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई शासन देत नाही. त्यामुळे तालुक्यातील वीटभट्टी चालकांवर मोठे संकट आहे.
                                                          -जगदीश पेरणे, वीटभट्टी चालक

तालुक्यात 500 च्यावर वीटभट्टी चालक-मालक आहेत. अवकाळी संकटाने सगळ्यांनाच बेजार केले आहे. पावसाने वीटभट्टी चालकांना जेरीस आणले आहे. तुटलेला माल परत वापरात येणे अशक्य आहे. वीटभट्टीसाठी नुकसानभरपाई मिळत नाही. अवकाळी पावसाने वीटभट्टी चालकांचे कोट्यवधींचे एकूण नुकसान केले आहे. त्यामुळे शासनाने वीटभट्टी मालकांकडे आता खर्‍या अर्थाने लक्ष देण्याची गरज आहे.
                           -सुनील घोडविंदे, अध्यक्ष, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स संघटना

 

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply