Breaking News

कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्रासाठी मोठी उपलब्धी -राज्यपाल रमेश बैस

पनवेलमध्ये विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचे भूमीपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

15 जुलै 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया मोहिमेची घोषणा केली, ज्यामध्ये त्यांनी या मोहिमेंतर्गत संपूर्ण भारतातील 40 कोटी लोकांना कुशल बनविण्याचे वचन दिले आहे. याचाच एक भाग म्हणून आज येथे कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचा भूमीपूजन समारंभ दिमाखात होत आहे, ही बाब महाराष्ट्र राज्यासाठी मोठी उपलब्धी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी पनवेल येथे केले.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचा भूमीपूजन समारंभ सोमवारी (दि. 27) पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व नाविन्यपूर्ण उपक्रम मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रवींद्र पाटील, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे उपस्थित होते.

राज्यपाल बैस पुढे म्हणाले की, या योजनेचा मुख्य उद्देश अशा लोकांना सक्षम करणे आहे ज्यांना खरोखर त्यांचे जीवन बदलायचे आहे, परंतु त्यांच्याकडे संसाधनांची कमतरता आहे आणि त्यामुळे ते गरीब जीवन जगत आहेत. भारतामध्ये जगातील सर्वांत जास्त तरुण लोकसंख्याआहे. तरीही भारतीय उद्योजक कुशल मनुष्यबळाच्या तीव्र कमतरतेचा सामना करीत आहेत. सरकारने सुरू केलेल्या स्किल इंडिया मिशनचे उद्दिष्ट कौशल्य प्रदान करून रोजगारासाठी एक कुशल कार्यशक्ती निर्माण करून या समस्येवर तोडगा काढण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. सर्वसमावेशक वाढीसाठी सर्व स्तरांवर कुशल मानव संसाधन आवश्यक आहे. कौशल्य प्रशिक्षणाचा अनुभव असलेल्या खासगी क्षेत्र, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था यांना कौशल्यनिर्मितीच्या प्रक्रियेत एकत्रित करावे लागेल. वेग वाढविण्यासाठी, जागतिक आर्थिक परिस्थितीनुसार सुसंगत असलेल्या अशा कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. आजच्या काळात कौशल्य विकास करणे खूप सोपे आहे, जिथे एकीकडे इंटरनेटवर जवळजवळ सर्व काही विनामूल्य उपलब्ध आहे, तर दुसरीकडे सध्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे कौशल्य विकासाची संधी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, असे सांगून शेवटी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व हे कौशल्य विद्यापीठ फक्त महाराष्ट्र, भारत देशातीलच नव्हे तर जागतिक पातळीवरील एक आदर्श विद्यापीठ असेल, असा विश्वास व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच विक्रमी वेळेत महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे केल्याबद्दल महाराष्ट्र कौशल्य विकास विभागाचे, या विभागातील सर्वच अधिकारी-कर्मचार्‍यांचे विशेष कौतुक केले. ते पुढे म्हणाले, प्रशिक्षित मानव संसाधन ही आवश्यक बाब आहे आणि याकरिता कौशल्य विकास या विभागाची जबाबदारी खूप मोठी आहे. महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाची वास्तू आदर्शवत अशीच असेल. उद्योग आणि सेवा पुरवठा क्षेत्रातील चीनची एकाधिकारशाहीस पर्याय शोधण्यास जगातील सर्वच देश, उद्योजक प्रयत्न करीत आहेत. यात सर्वात जास्त संधी आणि शक्ती केवळ भारताकडे आहे, हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौशल्य विकास, मानव संसाधन यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे सांगून फडणवीस पुढे म्हणाले की, उद्योगासह सेवा पुरवठाही महत्त्वाची बाब आहे. त्या अनुषंगाने विविध कौशल्य विकासाच्या संधी येणार्‍या काळात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. रत्नागिरीत एक वास्तू तयारच आहे त्याचे लवकरच कौशल्य विकास उपकेंद्र म्हणून उद्घाटन करूया. आयटीआयसाठी सर्व प्रकारच्या उत्कृष्ट सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक ती सर्व तरतूद करण्यात आली आहे. लवकरच नवी मुंबईत स्टार्टअप हब सुद्धा सुरू करणार असून या कौशल्य विद्यापीठाच्या तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवश्यक सोयीसुविधांसाठी कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी आश्वासित केले.

उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी, कौशल्य विकास आणि उद्योग यांची योग्य प्रकारे सांगड घातल्यास महाराष्ट्र राज्याचे आणि आपल्या देशाचेही भवितव्य निश्चितच उज्ज्वल असेल, असा विश्चास व्यक्त केला. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्य विकास विद्यापीठाच्या सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांच्या कामाचे कौतुक करून हे कौशल्य विद्यापीठ जागतिक दर्जाचे बनविले जाईल, अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

सर्व मान्यवरांच्या भाषणानंतर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या थ्रीडी मॉडेलचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले व हे कौशल्य विद्यापीठ कशा स्वरूपाचे असेल याबाबत संगणकीय प्रारूप दर्शवणारी चित्रफीतही सर्वांना दाखविण्यात आली.

प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी केले. आभार प्रदर्शन स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

आयटीआय आणि उद्योगाची सांगड घालणारे महाराष्ट्र पहिले राज्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास या विषयाला खर्‍या अर्थाने चालना दिली. जगातील अमेरिका, इंग्लंड, चीन यांसारख्या देशांनी तेथील लोकसंख्येचा योग्य वापर करून कौशल्य विकास व तंत्रज्ञानाला चालना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आणि महाराष्ट्रातील प्रसन्न विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. महाराष्ट्र राज्य आयटीआय आणि उद्योगाची मोठ्या प्रमाणावर सांगड घालणारे पहिले राज्य ठरले आहे. पुढच्या 10-15 वर्षांमध्ये उद्योग आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply