पेण : प्रतिनिधी
विम नेटवर्क कंपनीच्या माध्यमातून टॉवर बसविण्यात येणार असून, त्याची प्रोसेस फी म्हणून 97 हजार रुपये घेऊन, आरोपीने प्रत्यक्षात टॉवर न बसवता फिर्यादीची फसवणूक केली व फिर्यादीने रक्कम परत मागितली असता त्यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपी विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आणि आरोपी यांची फोटो स्टुडिओच्या व्यवसायातून ओळख झाली असून, यातील आरोपीने केवाळे (ता. पनवेल) येथील मोकळ्या जागेत व फिर्यादीच्या सासुबाई प्रमिला अनंत गावंड (रा. पिरकोन, ता. उरण) यांच्या मोकळ्या जागेत विम नेटवर्क कंपनीच्या माध्यमातून टॉवर बसविण्याची बोलणी करून प्रोसेस फी म्हणून प्रत्येकी 48,500 प्रमाणे एकूण 97 हजार रुपये फिर्यादी यांच्याकडून घेतले, मात्र आरोपीने कोणत्याही प्रकारचे टॉवर न बसविल्याने फिर्यादीने प्रोसेस फीचे पैसे परत मागितले. एक महिन्यापूर्वी आरोपीने फिर्यादी यांना 28 हजार रुपये परत दिले.
सोमवारी (दि. 22) संध्याकाळी फिर्यादी व त्याचे वडील त्याच्या झायलो (एमएच 46, झेड 5550) गाडीने माणगाव येथून पनवेल येथे येत असताना, त्यांनी आपली गाडी आमटेम गावाजवळ थांबवून त्यांनी आरोपीकडे उर्वरित पैशाची मागणी केली. त्या वेळी आरोपीने फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यामुळे फिर्यादी व साक्षीदार परत त्यांच्या गाडीत बसले. त्या वेळी आरोपीने फिर्यादी यांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यात गाडीची डाव्या बाजूकडील काच फुटून नुकसान झाले व त्याच खिडकीद्वारे दुसरा दगड येऊन फिर्यादीच्या डाव्या कानाला दुखापत झाली. याप्रकरणी आरोपी विरुद्ध वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक म्हात्रे करीत आहेत.