श्रीवर्धन : प्रतिनिधी
रमजान महिना सुरू असताना श्रीवर्धन तालुक्यातील जसवली गावात बुधवारी (दि. 19) रात्री दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी दोन्ही गट ऐकायला तयार नसल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
जसवली गावात होळीचे मैदान आहे. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होळी लावली जाते. याच ठिकाणी हिंदू ग्रामस्थांची सान भरली जाते. ज्या ठिकाणी सान भरली जाते त्या ठिकाणी धर्मध्वज लावण्यात आलेले होते. या धर्मध्वजाच्या शेजारीच दुसर्या गटातील लोकांनी त्यांच्या धर्माचे झेंडे फडकविल्यामुळे दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. या वेळी पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडत सौम्य लाठीमार केला व जमावाला पांगविले.
या प्रकरणी दंगा माजविण्याचा प्रयत्न करणार्या दोन्ही गटांमधील लोकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींना अटक केली आहे, तर सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये अजून जे काही गुन्हेगार दिसतील त्यांनादेखील अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकारानंतर जसवली गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून संपूर्ण गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांची गस्त वारंवार सुरू आहे. त्याचप्रमाणे श्रीवर्धन शहरातदेखील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
दरम्यान, कोकणचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी श्रीवर्धन येथे येत गावातील नागरिकांच्या बैठका घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …