16 लाख रुपये कॉक्रीटीकरणावर खर्च; खड्डेमुक्त आवारासाठी आणखी लागणार निधी
माणगाव : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाचे असणार्या माणगाव बसस्थानक आवारात गेले अनेक दिवस प्रवासी नागरिक बसस्थानकात पडलेल्या मोठमोठ्या खड्यांशी सामना करीत होते. याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रशासन डोळेझाक करीत होते. नागरिकांची समस्या लक्षात घेता माणगाव तालुका शिवसेना युवासेना द. रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांचे नेतृवाखाली 22 जुलै रोजी माणगाव बसस्थानकातील पडलेल्या खड्यातील पाण्यात उभे राहून युवा सैनिक व शिवसेना पदाधिकारी यांनी आंदोलन छेडले होते. ही मागणी आ. भरत गोगावले यांच्याकडे केली होती. त्यानुसार आ. गोगावले यांनी राज्य परिवहन महामंडळाचे संबंधित अधिकार्यांकडे या मागणीचा पाठपुरावा करून बसस्थानकातील प्रवेशद्वाराजवळ 16 लाख रुपये कॉक्रीटीकरणाचे काम मंजूर करुन घेतले. ते काम एका ठेकेदारामार्फत करण्यात आले. मात्र उर्वरित बसस्थानक आवार खड्डेमुक्त करण्यासाठी आणखीन निधीची गरज भासत आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी न झाल्यास प्रवाशांना पावसाळ्यात चिखलातून पायपीट करावी लागणार आहे. या कामासाठी पुढचे पाऊल कधी? असा प्रांजळ सवाल प्रवासी नागरिक करीत आहेत.
22 जुलै रोजी युवासेनेने माणगाव बसस्थानकात खड्यांच्या दुरवस्थेबाबत आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी परिवहन मंडळाच्या प्रशासनाला आंदोलन कर्त्यांनी सविस्तर निवेदन दिले होते. त्यानंतर परिवहन महामंडळ प्रशासनाने तत्काळ जेसीबी लावून तात्पुरते खड्यांची डागडुजी केली होती. त्यानंतर 1 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सबंधित कामाच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या त्यानंतरही निविदा प्रक्रिया मंजुर करण्यात 3 महिन्यापासून दिरंगाई चालूच राहिली. आ. भरत गोगावले यांच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाकडे पाठपुरवा केल्यानंतर निविदा मंजुर करण्यात आली. 2 नोव्हेंबर रोजी संबंधित ठेकेदाराला कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली असून हे कॉक्रीटीकरणाचे काम सध्या पूर्ण झाले आहे.
माणगाव बसस्थानक आवारात कॉक्रीटीकरण संपूर्ण करणे गरजेचे असताना कांही बस कॉक्रीटीकरण झालेल्या फ्लॅटफॉर्मवर उभ्या केल्या जातात तर कांही बस कॉक्रीटीकरणाच्या बाजुला उभ्या केल्या जातात. त्यामुळे कॉक्रीटीकरण झालेल्या भाग उंच व कॉक्रीटीकरण न झालेला भाग खड्ड्यात अशी स्थिती आहे. त्यामुळे उर्वरित बसस्थानक आवारातील कॉक्रीटीकरण करणे गरजेचे आहे. ते पावसाळ्यापूर्वी न झाल्यास बस स्थानक आवारातील आर्धा भाग चिखलात राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. प्रवासी नागरिकांना बसस्थानकात ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गेली अनेक दिवस माणगाव बसस्थानकातील खड्ड्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात आमदार भरत गोगावले, रा.प.मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता, रायगड विभाग नियंत्रक, कनिष्ठ अभियंता, माणगाव आगार व्यवस्थापक यांनी उर्वरित लागणारा निधी मंजूर करून हे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरीकातून होत आहे.
महाड, माणगाव, पोलादपूर विधानसभा आ. भरत गोगावले यांच्या प्रयत्नातून बस स्थानक आवारातील कॉक्रीटीकरणासाठी निधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून 16 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यांचे काम संबंधित ठेकेदारामार्फत झाले. मात्र हा निधी अपुरा असल्याने उर्वरित संपूर्ण बसस्थानक आवारात कॉक्रीटीकरण करण्यासाठी आणखी निधीची गरज आहे. या निधीसाठी आपण आ. गोगावले साहेबांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार आहोत. तसेच बसस्थानक आवारात पाणपोईसाठी दानशूरांच्या सहभागातून उभारण्यात येणार आहे.