Breaking News

विरोधी पक्ष विषाप्रमाणे काम करतोय -आमदार संजय केळकर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष हा सत्ता लोकांच्या सेवेसाठी म्हणून बघतो, मात्र विरोधक स्वार्थासाठी सत्ता मिळवू पाहत आहे. त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीपासून विरोधकांनी अपप्रचार सुरू केला आहे. विष ज्या प्रमाणे पसरवले जाते त्या प्रमाणे विरोधी पक्ष विषारी काम करत आहेत, अशी घणाघाती टीका भाजप नेते, ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी (दि. 6) पनवेल येथे केली. भाजप उत्तर रायगड जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची बैठक शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. त्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
या बैठकीस व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सदस्य बाळासाहेब पाटील, कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारूशीला घरत, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, अभिजित पेडणेकर, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, खोपोली अध्यक्ष रमेश रेटरेकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, भाजप कर्जत विधानसभा संयोजक किरण ठाकरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आदी उपस्थित होते. या बैठकीला स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, विविध सेल, मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार संजय केळकर यांनी पुढे बोलताना म्हटले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आपण जगात एक नंबरवर आहोत. आपल्या देशाचा सर्वांगीण विकास होत असताना आजूबाजूच्या राष्ट्रांनाही मोदीजींनी ताकद दिली आहे. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत घोटाळे केले, मात्र आता सत्ता हाती लागत नाही हे पाहून समाजामध्ये तेढ करणारे वातावरण निर्माण करण्यात आले आणि जातीपातीचे राजकारण करून बेदाग मोदी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले.
महिलांच्या सन्मानार्थ योजना राज्य सरकारच्या माध्यमातून अमलात आणल्या गेल्या आहेत, मात्र विरोधकांकडून त्या योजनांच्या बाबतीतही अपप्रचार करण्याचा डाव सुरू झाला आहे. विरोधकांनी हा रडीचा डाव बंद करावा, अशा शब्दांत आमदार केळकर यांनी खडे बोल सुनावले. एकेकाळी सरपंच झाला तरी आम्ही आनंदाने उडी मारून स्वागत करायचो. लोकसभेत पनवेलने मतांची मोठी आघाडी मिळवून दिली आहे. त्यामुळे पक्षाला अनुकूल वातावरण निर्माण झाले असून आता हा रायगड जिल्हा पूर्णपणे भाजपमय झाला आहे. उत्तर रायगड जिल्ह्यात सर्व जागा जिंकू असा विश्वास आमदार केळकर यांनी व्यक्त केला.
प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः ही महत्त्वाची निष्ठा पक्षाने कधीही बदलली नाही. अंत्योदयाचा विचार पक्षाचा मूळ आधार असून कार्यकर्ता ही भाजपची संपत्ती आहे. 30 वर्षांपूर्वी काँग्रेसने लोकसभेच्या 240 जागा जिंकल्या. त्यानंतर कधीही काँग्रेसला एवढ्या जागा जिंकता आल्या नाहीत. नापास होऊनही आपण पास झालो आहोत असा अविर्भाव काँग्रेसकडून केला जात आहे. सकाळी एक जण उठून फक्त टीव्हीवर येतो आणि नुसताच हमरी तुमरीवर येतो. एक तर मी राहीन नाही तर तू राहशील अशी भाषा महापुरुष, संतांच्या भूमीत केली जात असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून कामे केली नाहीत, पण प्रकल्पांना स्थगिती देण्याचे काम मात्र चोख केले आहे, अशी टीका या वेळी आमदार केळकर यांनी केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी यांना देशाने तिसर्‍यांदा कौल दिला, मात्र सलग निवडणुका नापास झालेल्या काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्‍यांना स्वतःचे चिंतन करण्याऐवजी दुसर्‍याच्या बाबतीत अपप्रचार करण्यात धन्यता वाटत आहे. जातीपातीचे राजकारण करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केल्याचे सर्व देशाने बघितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान कधीही बदलणार नाही, मात्र त्याचाही दुरूपयोग करून फेक नरेटिव्ह पसरवण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निवडणुकीत पराभव करण्याचे पाप काँग्रेसने केले आणि त्याच काँग्रेसने आता संविधानावरून देशात अशांतता माजवण्याचे काम केले. सत्ता आल्यावर दरमहा आठ हजार देण्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली होती. मग ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे तेथील महिलांना केलेल्या घोषणाप्रमाणे का पैसे देत नाहीत, असा सवाल करत राहुल गांधी बेताल वक्तव्य करत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. त्यांचे पणजोबा, आजी, वडील देशाचे पंतप्रधान होते. मग त्यांनी जातीय जनगणना आणि आरक्षणावर का काम केले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
भाजप बोलतो ते करून दाखवतो आणि त्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारकडून लोकांच्या विचारसरणीने कामकाज सुरू आहे. ही कामे जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहन कार्यकर्त्यांना करून विरोधक विखारी नरेटिव्ह पसरवण्याचे काम करत आहे, पण आता सुजाण जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वासही आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी दिलेली जबाबदारी कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे पार पाडली असल्याचे सांगितले आणि सर्वांचे त्याप्रती आभार मानले. जिल्ह्याची संघटनात्मक रचना मजबूत झाली आहे. म्हणूनच आपण लोकसभा निवडणुकीत यश मिळवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक रचनेने आपल्याला काम करायचे आहे. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॅट्ट्रिक केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावाला जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनी सर्वांच्या वतीने अनुमोदन दिले. या वेळी सर्वांनी हात उंचावून आणि घोषणा देत अनुमोदन दिले.
कोकणात महायुतीने मिळविलेल्या यशाबद्दल मंत्री रवींद्र चव्हाण यांचा 100 टक्के स्ट्राईक राहिला असून त्यांच्या अभिनंदनाचाही ठराव या वेळी मांडून मंजूर करण्यात आला.
प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी नवमतदार नोंदणी अभियानासंदर्भात माहिती दिली. या वेळी चारुशीला घरत यांनी निधन पावलेल्या व्यक्तीना श्रद्धांजली अर्पण करण्याचा शोक प्रस्ताव मांडला. या बैठकीचे सूत्रसंचालन दीपक बेहेरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अमरीश मोकल यांनी मानले.

एस.के. नाईक तालुका उपाध्यक्षपदी

रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती एस.के. नाईक यांची भाजप पनवेल तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विस्तारित जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदान करण्यात आले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply