पनवेल : रामप्रहर वृत्त
बनावट कागदपत्रे तयार करून नैना क्षेत्रात बांधकाम परवानगी दिल्याप्रकरणी उसर्ली खुर्द ग्रामपंचायतीचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच प्रमिला मोहन भगत आणि विश्वास लक्ष्मण भगत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल येथील सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने फेटाळला होता. यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असता आरोपींच्या गैरव्यवहाराबाबतचा अहवाल सहा आठवड्यांत सादर करण्याचे आदेश कोर्टाने शासनाच्या संबंधित विभागाला दिले आहेत.
माजी सरपंच प्रमिला भगत व विश्वास भगत यांनी अधिकार नसताना उसर्ली खुर्द ग्रामपंचायतीची बोगस कागदपत्रे व शिक्के तयार करून ग्रामपंचायत हद्दीतील नैना क्षेत्रात अनेक बांधकाम परवानग्या दिल्या होत्या. नैना स्थापन होण्यापूर्वीची तारीख टाकून या परवानग्या दिल्या असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी पनवेलच्या गटविकास अधिकार्यांना प्रमिला भगत व विश्वास भगत यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उसर्ली खुर्दचे ग्रामसेवक आर. एम. ढेरे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात प्रमिला भगत आणि विश्वास भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने प्राप्त पुराव्याच्या कागदपत्रांची छाननी करून पनवेल शहर पोलिसांनी तत्कालीन सरपंच विश्वास भगत व प्रमिला भगत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर विश्वास भगत व प्रमिला भगत यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पनवेल येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता, मात्र हा अर्ज 7 डिसेंबर 2022 रोजी न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणाची कसून चौकशी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. उच्च न्यायालयानेदेखील माजी सरपंचांचा अटकपूर्व जामीन 20 फेबु्रवारी 2023 रोजी फेटाळला व संबंधित विकसकांना सहआरोपी करून चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले.
यानंतर माजी सरपंचांनी अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टाने ही याचिका दाखल करून घेऊन शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच प्रमिला मोहन भगत आणि विश्वास लक्ष्मण भगत यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबतचा सर्व अहवाल बोगस कागदपत्रांसहीत सहा आठवड्यांत लेखी सादर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत. त्यामुळे शासनाच्या अहवालानंतर सुप्रीम कोर्टात या प्रकरणी पुढील कार्यवाही होणार आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …