Sunday , September 24 2023

पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी

कर्जत : प्रतिनिधी
वटपौर्णिमा शनिवार (दि. 3) उत्साहात साजरी झाली. सुटी असल्याने चाकरमानी महिला दुपारच्या सुमारास वटवृक्षाची पूजा करण्यासाठी बाहेर पडल्या. कडक उन्हाळा असल्याने सुहासिनी अगदी संध्याकाळपर्यंत मनोभावे वटवृक्षाची पूजा करीत होत्या.
यंदा विवाह सोहळे नेहमीप्रमाणे उत्साहात पार पडले. अगदी काल-परवापर्यंत विवाह होत होते. त्यामुळे वटपौर्णिमेसाठी नववधूंची संख्या मोठी होती. पारंपरिक वेशभूषा करून सुहासिनी वटवृक्षाला फेर्‍या मारण्यासाठी तयार होत्या. विविध कामांसाठी अनेक जुने वड तोडण्यात आल्याने सुहासिनींना वटवृक्षाची पूजा करण्यासाठी पायपीट करावी लागली, तर काही महिलांनी वडाच्या झाडाच्या फांद्या घरी आणून पूजा केली.
हल्लीच्या मोबाईलच्या जमान्यात काही सुहासिनींना सेल्फीचा मोह आवरता आला नाही, तर काहींनी अद्याप शाळा सुरू नसल्याने आपल्या लहान मुलांसह पूजेचा मुहूर्त साधला. ’सात जन्मी हाच नवरा मिळू दे’ अशी प्रार्थना करून वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply