पनवेल : बातमीदार
कळंबोलीतील स्टील मार्केटमधील बल रोडलाइन्स कंपनीत काम करणार्या सुरक्षा रक्षकाच्या अंगावर कंपनीचा मोठा वजनदार लोखंडी गेट पडल्याने या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कंपनीच्या वतीने लोखंडी गेटची डागडुजी न केल्यामुळे, तसेच त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील कुठल्याच प्रकारची उपाययोजना न केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कळंबोली पोलिसांनी या दुर्घटनेला जबाबदार धरून कंपनीच्या मालकासह अन्य संबंधित व्यक्तीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
या दुर्घटनेत मृत पावलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव इंदरराव खेडेकर (39) असे असून ते कळंबोली सेक्टर 12 मधील त्रिवेणी संगम सोसायटीत राहत होते, तसेच ते कळंबोलीतील स्टील मार्केटमधील बल रोडलाइन्स प्रा.लि. या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. रात्रपाळीवर असलेले खेडेकर बुधवारी रात्री 8 वाजता कामावर गेले होते. मात्र रात्री 11च्या सुमारास कंपनीतील मोठा वजनदार लोखंडी गेट त्यांच्या अंगावर पडला. यात खेडेकर जखमी झाल्याने त्यांना कळंबोलीतील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे उपचार सुरू असताना दुसर्या दिवशी, गुरुवारी पहाटे 3च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात, तो गेट खूप वजनदार असल्याचे, तसेच लोखंडी गेटच्या खालील बाजूस खांब गंजल्याचे आढळून आले. या लोखंडी गेटची वेळोवेळी डागडुजी करणे आवश्यक असतानादेखील कंपनीकडून या गेटची डागडुजी करण्यात आली नसल्याचे आढळून आले, तसेच येथे आवश्यक त्या सुरक्षाविषयक उपाययोजना करणे आवश्यक असतानाही, कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले. खेडेकर यालादेखील कंपनीने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही सुविधा दिल्या नसल्याचे आढळून आले. त्यामुळे कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.