रसायनी : प्रतिनिधी
बुद्धपौणिमा मानवतेचे ज्ञान पुष्प मानवतेच्या झाडावर फुललेले हे पुष्प जे अपरिमित वर्षानंतर एकदाच उमलते. सम्यक सामाजिक संस्था व सम्यक महिला मंडळ यांच्या वतीने रसायनीत शनिवार (दि. 18) रात्रीपर्यंत भीम महोत्सव रिस-कांबा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सम्यक सामाजिक संस्थेचे सदस्य व सम्यक महिला मंडळाचे पदाधिकारी सदस्य एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात संयुक्त जयंती भीम महोत्सव साजरा करत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती आणि भीम महोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांच्या हस्ते ध्वजवंदना देत भीम महोत्सव साजरा करण्यासाठी शुभारंभ केला. तदनंतर रेखाताई गायकवाड यांच्या हस्ते सुगंधित वातावरणात दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर बुद्धवंदना करण्यात आली. या वेळी माजी सरपंच कृष्णा पारंगे, अॅड. डी. जी. दांडगे, एचआयएलचे जांभुळकर साहेब, एचओसीचे माथुर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या महोत्सवात उपस्थित असणार्या पत्रकारांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला, तर ज्येष्ठ नागरिक म्हणून मोहन कांबळे यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच समाजात विविध क्षेत्रात कार्य करणार्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
भीम महोत्सवानिमित्त गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रसायनी व आसपासच्या परिसरातील तरुणाईने आपापली कला गाण्यातून सादर केली. या वेळी रसिक श्रोत्यांनी टाळ्यांनी दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद मोहिते यांनी केले, तर आभार महेंद्र जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड व त्यांच्या सहकार्यांनी अथक परिश्रम घेतले.