उरण ः वार्ताहर
श्री हनुमान जन्म दिवस सोहळा उरण शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात शनिवारी (दि. 16) साजरा करण्यात आला. शहरातील मोरा, गणपती चौक, भोवरा, हनुमान कोळीवाडा, चिरनेर, करंजा, नवीन शेवा आदी ठिकाणी भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
शहरातील गणपती चौक येथील श्री हनुमान मंदिरातील मूर्ती सन 1638 सालातील सुमारे 372 वर्षांपूर्वीची आहे. येथील श्री हनुमान जयंती उत्सव मंडळ उरण यांच्या वतीने श्री हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे 4 वाजता महापूजा, 5 वाजता कीर्तनकार हभप सुधीर महाराज पाटील यांचे कीर्तन झाले. सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत श्री. गजानन प्रासादिक भजन मंडळ यांचे भजन, दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत कै. सुनिता महादेव ढोले व कै. मीना रूपचंदानी यांच्या सौजन्याने भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत श्री गुरुदत्त प्रासादिक भजन वावंजे (कुंभारवाडा) रायगड भूषण श्री विष्णू बुवा वावंजेकर यांचे भजन, रात्री 9 वाजता पालखी मिरवणूक काढण्यात आली.