पनवेल : वार्ताहर
मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीररित्या अग्निशस्त्रासह जिवंत राउंड जवळ बाळगल्याप्रकरणी दोघाजणांना कामोठे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या अटकेमुळे सणासुदीच्या दिवसात ते कशासाठी या ठिकाणी वावरत होते याचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.
आरोपी अनिल गायकवाड (वय 29, रा. ऐरोली) व त्याचा सहकारी अर्जुन विश्वकर्मा (वय 29) या दोघांजवळ गावठी बनावटीचे लोखंडी धातूचे सिल्वर कलरचे (पिस्टल) व जिवंत राउंड जवळ बाळगून ते मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीररित्या फिरत असल्याची माहिती बातमीदाराकडून कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण राऊत, शिपाई विजय श्रीनामे व त्यांच्या पथकाने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ अडीच लाख रुपये किमतीचे अग्निशस्त्र, नऊ जिवंत काडतुसे, दोन मोबाइल फोन व सिल्व्हर रंगाचे मॅगझीन असा मिळून दोन लाख पंच्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.