खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
खोपोली प्रभाग नंबर 1 सुभाषनगर येथील विविध नागरी समस्यांबाबत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने मुख्याधिकारी अनुप दुरे यांना निवेदन दिले आणि तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
खोपोली सुभाष नगर येथील मस्को स्टील रेल्वेगेट ते सुभाषनगरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करून या रस्त्याला माजी उपनगराध्यक्ष सखाराम जाधव यांचे नाव देण्यात यावे, जी 5 मस्को क्लब ते अय्यप्पा स्वामी मंदिर रस्त्याचे डांबरीकरण करावे तसेच या रस्त्यावरील विद्युत पोल उभारून स्ट्रीट लाईट सुरू करावी तसेच नगर परिषद परिवहन सेवा खोपोली ते सुभाषनगरपर्यंत सुरू करावी, सुभाषनगर येथे स्वच्छता मोहीम राबवावी या सह इतर समस्यांचे निवेदन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी अनुप दुरे यांना देण्यात आले.
या शिष्टमंडळात भाजप महिला मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, भाजप तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर, माजी अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, स्थानिक युवा नेते राहुल जाधव, वैद्यकीय सेलचे डॉ. बबन नागरगोजे, भाजप शहर चिटणीस गोपाळ बावस्कर, विकास खुरपडे, प्रवीण शाह, देवेंद्र पाटील, बबन नागरगोजे, अजय इंगुळकर, जितू शाह, अश्विनी अत्रे, अपर्णा साठे, अनिता शाह यांचा समावेश होता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्याधिकार्यांना तातडीने प्रश्न मार्गी लावावे, अशा सूचना केल्या.
दरम्यान, या समस्यांचे निवारण येत्या दहा दिवसांत केले नाही, तर भाजपतर्फे नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवा नेते राहुल जाधव यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.
Check Also
आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे
तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …