Breaking News

आरटीई प्रवेश प्रक्रियेतील अडचणी दूर कराव्यात

आमदार प्रशांत ठाकूर यांचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांना पत्र

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्र व दाखल्यांची पूर्तता करण्यात पात्र विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी दूर करण्याची मागणी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांना पत्राद्वारे केली आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रे व दाखल्यांची पूर्तता करण्याबाबत होणारी पालकांची अडचण लक्षात घेता, या समस्येवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्यात विशेषतः पनवेल तालुक्यातील आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासकीय संपामुळे व इतर साप्ताहिक सुट्ट्या असल्याने शासकीय कार्यालये बंद असतात. यामुळे विद्यार्थ्याच्या पालकांना ऑनलाईन प्रक्रियेच्या विहीत मुदतीत दाखले न मिळाल्यामुळे जवळपास पनवेल तालुक्यातील 300 ते 400 पात्र विद्यार्थ्यांचे दाखल्यांअभावी प्रवेश होणार नाही, तसेच उत्पन्नाचा व जातीचा दाखला 25 मार्च 2023 नंतरचे ग्राह्य धरले जाणार नसल्याचे गटशिक्षणाधिकारी, पनवेल पंचायत समिती यांचे म्हणणे आहे.
आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार असल्याच्या आशेवर असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी दुसर्‍या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केला नाही. त्यामुळे आजमितीला दुसर्‍या शाळेत प्रवेश मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे आरटीई पात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत 25 मार्च 2023 तारखेबाबत निर्माण होणारी अडचण दूर करावी, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या पत्रात नमूद केले आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply