Breaking News

राष्ट्रवादीतही उठाव

शिवसेना पक्षात उठाव होऊन महाराष्ट्रात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते अजित पवार आणि सहकारी नेते राज्य सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांचा शपथविधीही झाला. त्यामुळे राज्यात आणखी वेगळी समीकरणे उदयास आली आहेत.

महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते असलेले राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप-युती सरकारमध्ये सहभागी होत रविवारी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यपाल रमेश बैस यांनी पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पवार यांच्यासोबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनादेखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. लोकांमध्ये मिसळणारे आणि प्रशासनावर पकड असलेले अजित पवार हे राज्यातील महाविकास आघाडीच्या राजकारणाला कंटाळले होते. त्यांनी आपली इच्छा नसताना विरोधी पक्षनेतेपद दिले असून आपल्याकडे पक्षांतर्गंत इतर जबाबदारी द्यावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. यासाठी त्यांनी 1 जुलैपर्यंत अल्टिमेटमही दिला होता. यानंतर अखेर त्यांनी मोठा निर्णय घेतला. तत्पूर्वी, त्यांनी आपला विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामाही दिला होता, असे आता समोर आले आहे. यावरून ते किती नाराज होते याची कल्पना येऊ शकते. सत्तेवरून पायउतार झालेल्या महाविकास आघाडीची दिशा भरकटत चालल्याचे पाहून त्यांनी विकासाच्या दृष्टीने भाजप युती सरकारला साथ देण्याचे ठरवले. गेल्या अनेक दिवसांपासून वेगळी भूमिका घेण्याचे संकेत त्यांच्याकडून मिळत होते, पण हे सारे एवढ्या लवकर घडून येईल असे वाटत नव्हते, मात्र सूत्रे वेगाने हलली आणि राज्यातील सरकार आता अधिक मजबूत झाले आहे. अजित पवार यांच्यामुळे राज्यात दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. त्यांनी आतापर्यंत पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांनी नवा विक्रम रचला आहे. विशेष म्हणजे एकाच टर्ममध्ये तीन वेळा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे पवार हे पहिलेच नेते ठरले आहेत. त्यांनी ज्या वेळी 2019मध्ये पहाटेच्या वेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती त्या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार नव्हते. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे मातब्बर नेते असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, अमोल कोल्हे यांसारखे नेते अजित पवार यांच्यासोबत भाजप युतीसोबत गेल्याने या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एवढेच नव्हे तर अजित पवार यांनी पक्षावर दावा केला आहे. याशिवाय 2024ची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबत का नाही, असेही अजितदादांनी सांगितले. आता राज्यातील सरकारला मोठे बळ मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याची वाटचाल आणखी जोमाने होईल. शिवाय आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी व सहकार्‍यांना महाराष्ट्रातून अधिक ताकद मिळेल.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply