बसचालकांसह विद्यार्थ्यांना होतोय त्रास
खोपोली ः प्रतिनिधी
नगर परिषदेच्या सिटी बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बसस्थानकातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बस आदळत आहेत. सिटीबस सेवा ठेकेदार पद्धतीने सुरू असल्याने बसस्थानकातील खड्डे ठेकेदार की, नगर परिषद याबाबत साशंकता असल्याले खड्ड्यांचा त्रास मात्र सामान्यांना सहन करावा लागत आहे.
राज्यातील एकमेव खोपोली नगर परिषद आहे ती स्वतःची सिटी बस सेवा चालवत आहे. लोणावळा, खालापूर, देवन्हावे, आडोशीसह शहरातील विविध हद्दीत सिटी बस सेवा सुरू आहे.त्यामुळे सिटी बसस्थानकाची संपूर्ण जबाबदारी ठेकेदाराकडे दिली आहे. शहरातील सर्वच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असतानाच सिटी बसस्थानकातील डांबरीकरण का केले नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सिटी बसस्थानकात पडलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नाही. यामुळे बस खड्ड्यात आदळून याचा त्रास बसचालक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. खड्ड्यातील साचलेले खराब पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. यातून मार्ग काढताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. सिटी बसस्थानकातील प्रवासी शेडला कुलूप असते. त्यामुळे प्रवाशांना पावसात उभे रहावे लागते. बसस्थानकात स्वच्छतेचा अभाव आहे. त्यामुळे खड्डे लवकरात लवकर भरण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.