मंजिरी भावसार ठरली ‘मिस मुंबई’
मुंबई : प्रतिनिधी
मुंबई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात आजवर एकाच मोसमात नवोदित मुंबई श्री किताब जिंकल्यानंतर मुंबईच्या बाहुबलींना नमवून ‘मुंबई श्री’चा बहुमान पटकाविणारा अनिल बिलावा हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. अनिल बिलावाने सलग दोन स्पर्धा जिंकून एक नवा आणि अत्यंत दुर्मीळ असा इतिहास रचला. महिलांच्या फिजिक स्पोर्ट्स प्रकारात पीळदार सौंदर्यवतीच्या मिस मुंबई स्पर्धेत एफएसटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली; तर पुरुषांच्या फिजिक स्पोर्ट्स प्रकाराच्या 170 सेंमी उंचीच्या गटात आरकेएमचा महेश गावडे आणि 170 सेंमीवरील उंचीच्या गटात बाल मित्र व्यायामशाळेचा शुभम कांदू अव्वल आला.
बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई उपनगर बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनने दिलेल्या आयोजनाच्या संधीचे आरोग्य प्रतिष्ठानने अक्षरश: सोने केले. त्यांनी केलेल्या भव्यदिव्य आणि दिमाखदार आयोजनामुळे स्पार्टन मुंबई श्रीचे वातावरण आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले होते. त्यानिमित्ताने एका जिल्हास्तरीय स्पर्धेलाही आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्लॅमर देऊ शकतो, हे आरोग्य प्रतिष्ठानने दाखवून दिले. मुंबईकर आणि शरीरसौष्ठवपटूंच्या फिटनेससाठी प्रथमच आयोजित केलेला मुंबई फिटनेस सोहळा तब्बल पाच हजारांपेक्षा अधिक क्रीडाप्रेमींच्या गर्दीमुळे ब्लॉकबस्टर हिट ठरला.
गेल्या तीन महिन्यांत धारावी श्री, दहिसर श्री, शंकर श्री, साहेब श्री, पुंचिकोरवे श्री अशा सलग पाच स्पर्धा जिंकणारा सुशील मुरकरच यंदाच्या मुंबई श्रीचा संभाव्य विजेता वाटत होता, पण वजन तपासणीच्या वेळी अचानक आलेला अनिल बिलावा 80 किलो वजनी गटात खेळला आणि 81 किलो वजन असलेला सुशीलही एक किलो कमी करून त्याच गटात खेळला. बिलावाबद्दल कसलीही कल्पना नसल्यामुळे सुशीलचे 80 किलो वजनी गटात खेळल्याचे गणित चुकले आणि तो बिलावाकडून गटातच बाद झाला. खरे सांगायचे तर बिलावानंतर मुंबई श्रीमध्ये सुशीलच सर्वोत्तम शरीरसौष्ठवपटू होता, जर सुशील 85 किलो वजनी गटात खेळला असता तर तो गटविजेता ठरला असता आणि त्याने 50 हजार रुपयांचे उपविजेतेपदही संपादित केले असते. 80 किलो वजनी गटात अनिल इतक्या जबरदस्त तयारीत होता की प्राथमिक चाचणीतच त्याचे जेतेपद निश्चित झाले होते. त्याने फक्त मुंबई श्रीचा ऐतिहासिक चषक उंचावण्याची औपचारिकता पूर्ण केली. या स्पर्धेतून मार्च महिन्यात होणार्या महाराष्ट्र श्रीसाठी 12-12 खेळाडूंचे मुंबईचे दोन संघही निवडण्यात आल्याची माहिती मुंबई संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली.
या दिमाखदार स्पर्धेचा पुरस्कार सोहळा शिवसेना खासदार अरविंद सावंत, व्यायाममहर्षि मधुकरराव तळवलकर, भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पाठारे, महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे प्रशांत आपटे, मुंबई शरीरसौष्ठव संघटनेतील अमोल कीर्तिकर, अजय खानविलकर, मदन कडू, राजेश सावंत, सुनील शेगडे, शरीरसौष्ठवपटूचे स्फूर्तिस्थान श्याम रहाटे, मनीष आडविलकर, आरोग्य प्रतिष्ठानचे किरण कुडाळकर, प्रभाकर कदम, राजेश निकम, माजी खासदार संजय पाटील आणि स्पार्टन न्यूट्रिशनचे प्रमुख वृषभ चोकसी यांच्या उपस्थितीत झाला.