इच्छाशक्ती आणि त्यासाठी परिश्रम घेण्याची तयारी असेल तर काय करता येते हे भारताचे यशस्वी आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे. आधी अमेरिका आणि इजिप्त आणि त्यानंतर फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती (यूएई) असे दौरा करून पंतप्रधान मोदींनी भारताच्या पदरात खूप काही पाडून घेतले आहे. या दौर्यांचे फलित येत्या काळात पहावयास मिळेल.
सन 2014पासून भारतात नवे पर्व पहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकास आणि प्रगतीचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी पंतप्रधान स्वत: रात्रंदिवस मेहनत घेत असल्याचे दिसून येत आहे. देशात 2014 पूर्वी भ्रष्टाचार माजला होता. सरकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहण्याऐवजी मधल्या मध्येच हडप केला जात होता. घोटाळे, गैरव्यवहारांच्या मालिका सुरू होत्या. गोरगरीब, सामान्य जनता पिचली, भरडली जात होती. अशा वेळी नरेंद्र मोदी यांच्या रूपाने जनतेमधून त्यांचा नायक उदयास आला. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतवर्षाने सन 2014 आणि 2019 असे सलग दोन वेळा नरेंद्र मोदींना बहुमताने पंतप्रधानपदावर विराजमान केले, कारण या नेत्याने ‘सबका साथ सबका विकास’ या विश्वासाने देशाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी शेतकर्यांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना, गोरगरीबांसाठी गरीब कल्याण योजना, सर्वसामान्यांकरिता जनधन योजना, महिलांची चुलीच्या धुरातून मुक्तता होण्यासाठी उज्ज्वला योजना, आरोग्यासाठी आयुष्यमान योजना, पाणीटंचाईवर हर घर जल, हर घर नल योजना अशा विविध जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून परिवर्तन केले. त्यामुळे भारताचा चेहरामोहरा बदलला. ठोस निर्णय, बहुमोल अभियान राबवून नागरी उत्थानाला दिशा दिली. या सार्याचा परिपाक म्हणजे जागतिक पातळीवर दहाव्या क्रमांकावर असलेली आपली अर्थव्यवस्था तिसर्या क्रमांकावर दृष्टिक्षेपात आली. साहजिकच याचे प्रतिबिंब आंततराष्ट्रीय पातळीवरही उमटू लागले. याआधी आपला देश व देशवासीयांना परदेशांमध्ये विशेषकरून प्रगतशील राष्ट्रांकडून हीन वागणूक मिळत होती. पंतप्रधान मोदींना तर अमेरिकेने एकेकाळी व्हिसा नाकारला होता. तेच सारे देश आता भारत आणि भारताचे पंतप्रधान मोदींसाठी पायघड्या घालू लागले आहेत. ज्या ज्या देशात पंतप्रधान मोदी जातात तेथे त्यांचे जंगी स्वागत केले जाते. एवढेच नव्हे; तर त्या देशांचा सर्वोच्च पुरस्कार देऊन आपल्या पंतप्रधानांना गौरविले जाते. याशिवाय विविध महत्त्वपूर्ण करार अनेक देशांसोबत केले जात आहे, ज्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये फायदा होणार आहे. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, रोजगार होऊन अनेक हातांना काम मिळणार आहे. पंतप्रधान मोदींचा कामाचा झपाटा असा आहे की एकदा हाती घेतलेली गोष्ट ते पूर्ण करेपर्यंत स्वस्थ बसत नाही. मग ते पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक असो की, कलम 370 रद्द करणे असो जे जे आवश्यक आहे ते ठाम भूमिका घेऊन ते मार्गी लावतात. सध्या समान नागरी कायदा त्यांच्या अजेंड्यावर आहे. यामुळे सर्व नागरिक भारतीय असतील. सर्व धर्मांना एकसारखाच कायदा असेल. हा कायदा लागू झाल्यास लग्न, तलाक आणि संपत्तीचे वाटपही समसमान होईल. अशा प्रकारे सर्वांना समान न्याय मिळेल. देशातील नागरिकांचे जीवन सुकर व्हावे यासाठी जे काही लागेल ते करण्यासाठी पंतप्रधान मोदी कटिबद्ध आहेत. म्हणूनच त्यांचा डंका भारतासह संपूर्ण जगात असल्याचे वेळोवेळी पहावयास मिळते.