अलिबाग : प्रतिनिधी
लायन्स, डायमंड व लिओ क्लबतर्फे चक्रीवादळग्रस्त कुटुंबांना गृहोपयोगी वस्तू तसेच नारळ व सुपारी रोपांचे वाटप करण्यात आले. त्याचा लाभ गरीब, गरजूंना मिळाला. सुमरादेवी, बेलीवाडी, मणेरपाडा, वडघर, आदाड, वाळवटी, वावे येथील आदिवासी वाड्यांतील सुमारे 200 कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले, तसेच शेतकर्यांना सुमारे सव्वादोन लाख रुपये मूल्याची साडेचार हजार सुपारी, नारळ व इतर रोपे वाटण्यात आली. जून महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात घरे व बागायतींचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. सामाजिक बांधिलकी जोपासत लायन्स क्लब ही सामाजिक संस्था चक्रीवादळग्रस्त कुटुंबीय व शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. चक्रीवादळग्रस्त कुटुंबीयांना चादर, चटई, पाण्याचे फिल्टर आदी गृहोपयोगी वस्तू स्वरूपात मदत आणि शेतकरी बांधवांना सुपारी, नारळ व इतर रोपांचे वाटप करण्याचा उपक्रम लायन्स क्लब अलिबाग, मांडवा, पोयनाड, रोहा, डायमंड क्लब व लिओ क्लब यांच्यामार्फत राबविण्यात आला. यासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल फाऊंडेशनने सुमारे साडेसात लाख रुपयांचा निधी रायगड जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे. हा निधी मिळविण्यासाठी लायन्स क्लबचे मनेश्वर नायक, शैलेश पोद्दार, प्रवीण सरनाईक व नयन कवळे यांनी अथक प्रयत्न केले. सुपारी, नारळ व इतर रोपे ट्रॅव्हर मार्टिस, अनिपा शर्मा, अनिल म्हात्रे, नितीन अधिकारी व अलिबाग क्लब यांनी पुरस्कृत केली. या देणग्या देण्यासाठी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राकेश चौमल, पूर्व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अनिल जाधव, रिजन चेअरमन प्रदीप सिनकर, झोन चेअरमन महेश मोघे यांच्यासह सर्व क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. त्यांनी वरसोली, आक्षी आणि फणसाड या गावांतील वादळग्रस्त कुटुंबे व शेतकर्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आणि त्यांना गृहोपयोगी वस्तू व रोपांचे वाटप केले. या उपक्रमासाठी भगवान मालपाणी आणि महेंद्र पाटील यांनी लायन किंग म्हणून काम पाहिले. वस्तू आणि रोपे गरजू लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी बहुसंख्य लायन्स सदस्य उपक्रमात सहभागी झाले होते.