Breaking News

पनवेल व उरण येथे 25 जुलैला होणार जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोणत्याही प्रकारची मशागत न करता लागवडी शिवाय व रासायनिक खत, कीडनाशकांशिवाय उगवलेल्या भाज्या म्हणजे रानभाज्या. कोकण भागात वनक्षेत्र भरपूर असून जैवविविधता देखील आहे. त्यामुळे प्राचिन काळापासूनच अशा आरोग्यवर्धक व सुरक्षित रानभाज्या औषधी म्हणून व रोजच्या आहारात देखील वापरल्या जात असत. आजही आदिवासी शेतकरी रानभाज्या जतन करत आहेत. या रानभाज्यांचे जंगलालगतचे आदिवासी आजही पारंपारीक अन्न म्हणून वापर करतात, म्हणूनच त्यांचे आरोग्य देखील उत्तम असते.
कोकणात प्रामुख्याने टाकळा, करटोली, शेवळी, अळू, अळंबी, कुरडू, फोडशी, भारंगी, सुरण, कुडा, बांबूचे कोंब, इ. रानभाज्या आढळून येतात. परंतु काही रानभाज्या जसे वाघारी, पेंढरी, तीरकमळ, मौले या काळासोबत नष्ट झाल्या आहेत. या भाज्यांप्रमाणे इतर रानभाज्या नष्ट होऊ नयेत, त्यांचा मानवी आहारात समावेश असावा तसेच पुढील पिढीला या औषधी ठेव्याचे महत्व व माहीती असावी याकरिता रानभाज्यांचे संरक्षण व संवर्धन गरजेचे असून त्यांचाच एक भाग म्हणून कृषी विभागाकडून दरवर्षी जुलै-ऑगस्ट दरम्यान जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
या वर्षीचा जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव मंगळवार, दि. 25 जुलै 2023 रोजी उरण व पनवेल या दोन तालुक्यातील निवडक ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व प्रदर्शनाकरिता आणि विक्रीकरीता उरण तालुक्यातील तेरापंथ हॉल उरण, फुल मार्केट जवळ, महाराष्ट्र भुषण डॉ.ना.वि. धर्माधिकारी शाळा क्रमांक-1 व 2 उरण, वैष्णवी हॉस्पिटलजवळ, श्री.बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल हॉल, दत्त मंदीर, विमला तलाव उरण, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह, चाणजे, ता.उरण ठिकाणी तसेच पनवेल तालुक्यात पंचायत समिती पनवेल, तहसिल कार्यालय पनवेल, कराठी समाज हॉल, सेक्टर- 14, कामोठे गाव, ता-पनवेल येथे स्टॉल कृषी विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
विविध ठिकाणी रानभाजी विक्रीसाठी कृषी विभागाच्यावतीने स्टॉल्स उपलब्ध करुन दिले जातील. कर्जत, खालापूर, पनवेल आणि उरण तालुक्यातील रानभाजी विक्रेत्या आदिवासी/शेतकरी यांनी, आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून जास्तीत जास्त रानभाज्या विक्रीसाठी आणाव्यात. तसेच सर्व नागरीकांनी या स्टॉल्सना भेट देऊन आरोग्यदायी रानभाज्यांची खरेदी करावी जेणेकरून आपल्या आहारात औषधी वनस्पती येतील व आदिवासी बांधवांच्या उपजिविकेस देखील आपले सहाय्य मिळेल, असे उप विभागीय कृषी अधिकारी खोपोली, नितीन वसंत फुलसुंदर यांनी कळविले आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply