कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत सरपंचाचे पद रिक्त करावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. कोल्हारे ग्रामपंचायत सरपंचांचे पद रिक्त व्हावे यासाठी रायगड जिल्हाधिकार्यांच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.दरम्यान, 10 फेब्रुवारीला सरपंचपदावर विराजमान झालेले महेश विरले यांच्यावर अनधिकृत बांधकामप्रकरणी अपात्रतेची टांगती तलवार आहे. कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांचे ग्रामपंचायत सदस्यपद अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवून रिक्त करण्यात यावे यासाठी रायगड जिल्हाधिकार्यांच्या न्यायालयात ग्रामपंचायत सदस्य विजय रामचंद्र हजारे यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ते हजारे यांच्या तक्रारीनुसार कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीमधील धामोते गावाच्या हद्दीत सर्व्हे नंबर 45/4मधील दोन गुंठे जमिनीवर बांधकाम करण्यासाठी महेश विरले आणि अमर मिसाळ यांनी केलेल्या अर्जावर कोल्हारे ग्रामपंचायतीने 29 मार्च 2019 रोजी बांधकाम करण्यास हरकत नाही अशी परवानगी दिली होती. ती परवानगी देताना कोल्हारे ग्रामपंचायतीने रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची तसेच अन्य परवानग्या घेण्याची लेखी सूचना केली होती. त्याच वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता बाधित करणे आणि प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई ग्रामपंचायत अधिनियमचा आधार घेऊन सदस्यत्व रद्द करावे, अशी शिफारस याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. या याचिकेमुळे कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून निवडून आलेले शिवसेनेचे महेश विरले यांच्या सदस्यपदावर अपात्रतेची टांगती तलवार आली आहे. दरम्यान, रायगड जिल्हाधिकार्यांच्या न्यायालयात या याचिकेवर 25 मार्च रोजी अलिबाग येथे सुनावणी होणार आहे. त्यामुळे या याचिकेवरील सुनावणीकडे लक्ष लागून राहिले आहे.