Breaking News

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पनवेलमध्ये

ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त
दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून यंदाच्या जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 17) येथे पत्रकार परिषदेत दिली.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष असून त्या संदर्भात विस्तृत माहिती देण्यासाठी खांदा कॉलनी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, कोषाध्यक्ष अमोल खेर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप, सदस्य चिन्मय समेळ उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 8 ते 10 डिसेंबरपर्यंत या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. तत्पूर्वी नागपूर, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा व पुणे केंद्राच्या प्राथमिक फेरी पार पडली असून 18 व 19 नोव्हेंबरला रायगड केंद्राची, तर 24 ते 27 नोव्हेंबरपर्यंत मुंबई, ठाणे, कल्याण व इतर केंद्रांची प्राथिमक फेरी होणार आहे. अंतिम फेरीचे उद्घाटन 8 डिसेंबर रोजी, तर पारितोषिक वितरण सोहळा 10 डिसेंबरला मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून त्यांना पुरस्कार जाहीर करताना खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी सांगितले की, या एकांकिका स्पर्धेत राज्यभरातून 100हून अधिक एकांकिकांचा सहभाग असतो. नवनवीन संकल्पना आणि दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने हा करंडक महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध झाला आहे. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत स्पर्धेचा आवाका वाढत आहे. सांस्कृतिक कट्टा राज्यभर पसरला असून या क्षेत्रातून कलाकारांना संधी देण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगतानाच ओमकार भोजने, संदीप रेडकर, अजिंक्य ननावरे हेसुद्धा मेहनत घेऊन अशाच स्पर्धेतून पुढे आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. स्पर्धेचा ब्रँड अँबेसिडर आणि स्पर्धेचे स्वतःचे शीर्षक गीत असलेली ही महाराष्ट्रातील एकमेव एकांकिका स्पर्धा असून यंदाच्या स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर सुप्रसिद्ध मालिका व सिने अभिनेते अजिंक्य ननावरे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक टीआयपीएल, सहप्रायोजक निल ग्रुप, तर मीडिया प्रायोजक इट्स माजा डॉट कॉम असल्याची माहिती दिली.

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply