सेंट्रल पार्क नावामध्ये मुर्बी गावाचा उल्लेख असलेला फलक ग्रामस्थांनी लावला
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबईकरांना प्रतीक्षा असलेली मेट्रोसेवा अखेर सुरू झाली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारचे उद्घाटन न करता येथील मेट्रोसेवा सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि. 17) बेलापूर ते पेंधर स्थानकादरम्यान पहिली मेट्रो धावली. या वेळी सिडकोचे जॉईंट एमडी कैलाश शिंदे, नवी मुंबई महापालिकेच आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते.
दरम्यान, बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावरील सेंट्रल पार्क स्थानक या नावामध्ये मुर्बी गावाचा उल्लेख असलेला फलक ग्रामस्थांनी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारीच या स्टेशनपाशी लावला.
या वेळी माजी नगरसेवक हरेश केणी, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, युवा अध्यक्ष नितेश पाटील, गाव अध्यक्ष जगदीश ठाकूर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गावाच्या नावासंदर्भात सिडकोने एक आठवड्यात कार्यवाही करावी; अन्यथा जुन्या फलकाला काळे फासू, असा इशारा या वेळी ग्राामस्थांनी दिला.