Breaking News

कर्नाळा बँक घोटाळा : 85 आरोपींविरुद्ध पुरावा गोळा करण्याचे काम सुरू

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यातील 85 आरोपींविरुद्ध पुरावा गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लक्षवेधी सूचनेला दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे.
पनवेल येथील कर्नाळा बँकेच्या अध्यक्ष व संचालकांनी हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचे उघडकीस आले आहे. बँकेतील या घोटाळ्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग-1, सहकारी संस्था अलिबाग जि. रायगड यांनी 17 फेब्रुवारी 2020 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. बर्‍याच कालावधीनंतर बँकेच्या अध्यक्षांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून अध्यक्षांना अटक होऊन जवळपास चार ते पाच महिन्यांचा कालावधी उलटूनसुद्धा बँकेच्या खातेदारांना आपली आयुष्याची पुंजी म्हणून बँकेत ठेवलेली रक्कम परत देण्यासाठी व्यवस्थापनाकडून असमर्थता दर्शविली जात आहे. बँकेतील या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या संचालक व अधिकार्‍यांवर अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे खातेदार व ठेवीदारांमध्ये शासनाविरोधात चिड निर्माण झालेली असून खातेदार व ठेवीदारांना बँकेतील त्यांच्या ठेवी तातडीने परत मिळण्यासाठी तसेच या गैरव्यवहारात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणार्‍या संचालक व अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई काय केली, अशी लक्षवेधी सूचना आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार
महेश बालदी यांनी मुंबई येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात दाखल केली होती.
या लक्षवेधीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, रिझर्व्ह बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्नाळा नागरी सहकारी बँक, पनवेल यांच्या 31 मार्च 2018 रोजी केलेल्या तपासणीत बँकेने मंजूर केलेल्या कर्ज प्रकरणामध्ये गंभीर आक्षेप निदर्शनास आल्यामुळे 22 एप्रिल 2019 रोजी बँकेच्या कर्ज व्यवहाराचे विशेष लेखापरीक्षण करण्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांना कळविले होते.
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या आदेशान्वये जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांनी लेखापरीक्षण करून कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या लेखा परीक्षणामध्ये बँकेचे अध्यक्ष, संचालक व पदाधिकारी यांनी संगनमताने केलेल्या विनातारणी, गैरविनियोग व गैरव्यवहारामुळे सभासद, बँकेचे ठेवीदार व खातेदार यांच्या ठेवी धोक्यात आल्या असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 तसेच भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्याची जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांनी शिफारस केली आहे. त्यानुसार कर्नाळा नागरी सहकारी बँक, पनवेल (ता. पनवेल जि. रायगड)चे अध्यक्ष व संचालक यांच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 78/2020 भा.दं.वि. कलम 409, 417, 420, 463, 465, 467, 468, 471, 120 (ब), 34 सह सहकारी संस्था अधिनियम कलम 147 सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल केलेल्या गुन्ह्यात 67 बनावट कर्ज प्रकरणांची व्याजासह रक्कम 543,61,49,372 रुपये अशी आहे. नमूद गुन्ह्यातील एकूण ठेवीदार 50,689 असून त्यांची एकूण ठेव रक्कम 529,72,40,879.93 रुपये आहे.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे ठेवीदार 50,689 असून त्यांचे केवायसी कागदपत्र प्राप्त करण्याचे, त्यांची यादी बनविण्याचे काम सध्या बँक व्यवस्थापनाकडून सुरू आहे. फिर्यादीतील 76 व निष्पन्न 9 असे एकूण 85 आरोपींविरुद्ध पुरावा गोळा करण्याचे काम सुरू आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष, संचालक-पदाधिकारी यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता याची माहिती घेऊन महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 अंतर्गत ही मालमत्ता गोठविण्याकरिता अधिसूचित करण्याबाबतचा प्रस्ताव रायगड जिल्हाधिकारी, अलिबाग यांच्याकडून शासनास प्राप्त झाला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने त्याबाबतची पडताळणी करून अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply