Breaking News

‘परे’ची वाहतूक विस्कळीत

मुंबई ः काल पश्चिम रेल्वेवरील वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे उशिराने सुरू होती. गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी साडेसातच्या सुमारास गोरेगाव स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पश्चिम  रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.  दरम्यान, पश्चिम रेल्वे प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त केला. दरम्यान, गेल्या आठवड्यातही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक उशिराने सुरू होती. डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने येणार्‍या लोकलसेवेवर याचा परिणाम झाला होता.

हलगर्जीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू?

सांगली ः सांगलीतील सरकारी रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या प्रियंका चव्हाण (24) या महिलेचे मृत्यू झाला असून संतप्त नातेवाइकांनी प्रियंकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. प्रियंका नऊ महिन्यांची गर्भवती होती, मात्र सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला दाखल करून घेतले नाही. मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयाबाहेर असताना प्रियंकाची प्रकृती खालावली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रियंकाला सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळीच रुग्णालयात दाखल करून न घेतल्याने तिचा मृत्यू झाला असून दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी तिच्या नातेवाइकांनी केली आहे. शवविच्छेदन तसेच फॉरेन्सिक तपासणीच्या आधारे प्रियंकाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधले जाईल व त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रशियन विमानांना अटकाव

नवी दिल्ली ः अलास्काच्या पश्चिमेला आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत आलेल्या सहा रशियन लष्करी विमानांना अमेरिकेच्या फायटर विमानांनी रोखले. या भागातून रशियन विमाने बाहेर जाईपर्यंत अमेरिकन फायटर विमानांनी त्यांचा पाठलाग केला. उत्तर अमेरिकेच्या हवाई सुरक्षा कमांडने ही माहिती दिली. या सहा विमानांत चार टीयू-95 स्ट्रॅटजिक बॉम्बर आणि दोन एसयू-35 फायटर विमाने होती. अमेरिकेच्या अत्याधुनिक एफ-22 फायटर विमानांनी रशियन बॉम्बर विमानांचा मार्ग रोखला. अमेरिकेच्या अवॉक्स टेहळणी विमानांचे या संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष होते. अलास्का हवाई सुरक्षा झोनमध्ये प्रवेश करताच या विमानांच्या हालचाली टिपण्यास सुरुवात झाली. अमेरिकन हवाई सुरक्षा यंत्रणेचे आपल्या हवाई हद्दीजवळ घडणार्‍या प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष असते. शत्रूकडून धोका आहे हे लक्षात येताच कमीत कमी वेळात उत्तर देण्यासाठी यंत्रणा सज्ज असते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply