नागपूर ः प्रतिनिधी
शेतशिवारात आग लावल्याने जळालेले बाभळीचे झाड रेल्वे रुळावर पडले होते. दरम्यान, या रेल्वे रुळावरून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इतवारी नागपूर रेल्वे स्थानक ते नागभीडकडे जाणारी पॅसेंजर धावत होती. अशातच कारगाव शिवारात झाड रेल्वे रुळावर पडल्याची बाब चालकाच्या लक्षात येताच ब्रेक लावत रेल्वे थांबविण्यात आली. अगदी झाडाच्या काही अंतरावरच रेल्वे थांबली. चालकाने वेळीच सतर्कता दाखविल्याने मोठा अपघात टळला. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. सदर घटनाक्रमामुळे रेल्वेगाडी सुमारे 15 मिनिटे उशिरा धावली. दिनेश येरणे असे चालकाचे, तर एस. डी. चांदेकर गार्डचे नाव आहे.
पॅसेंजरमध्ये साधारणत: 700 प्रवासी प्रवास करीत होते, अशी माहिती भिवापूर रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर प्रशांतकुमार यांनी दिली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळ अंतर्गत नागपूर ते नागभीड आणि नागभीड ते नागपूर अशा दिवसभरात एकूण आठ फेर्या सदर पॅसेंजरच्या होतात. नागपूर इतवारी रेल्वेस्थानकावरून मंगळवारी सकाळी 10.40 वाजता 58845 क्रमांकाची पॅसेंजर नागभीडच्या दिशेने निघाली होती. सदर रेल्वे उमरेड स्थानकावर दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी पोहचली. अशातच कारगाव शिवारात रेल्वे पोहचताच रेल्वे रुळावरच जळालेले काटेरी झाड पडले होते. चालक दिनेश येरणे यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत अगदी अचूक क्षणाला रेल्वे थांबविली. अचानकपणे रेल्वे थांबल्याने प्रवासी भयभीत झाले होते. लागलीच झाड पडल्याची बाब लक्षात येताच काही प्रवाशांनी हे झाड बाजूला करण्यासाठी पुढाकार घेतला. 15 ते 20 मिनिटांत झाड बाजूला केल्यानंतर सदर रेल्वे भिवापूरच्या दिशेने निघाली.