Breaking News

पनवेल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत चिताज सुपरकिंग्ज विजेता

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अ‍ॅकेडमीच्या वतीने झालेल्या 23 वर्षाखालील पनवेल प्रीमियर लीग स्पर्धेत चिताज सुपर किंग्ज संघ अंतिम विजेता ठरला. ही स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवर पनवेल येथील महात्मा फुले आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या भव्य क्रीडांगणावर झाली.

स्पर्धेत लावाज रॉयल्स, चिताज सुपरकिंग्ज, शामशेठ सुपरकिंग्ज, हायरीच सुपरस्ट्रायकर्स, विराज सुपरकिंग्ज, शिवम प्रजापती वॉरियर्स, अशा सहा संघांचा समावेश होता. रायगड जिल्ह्यातील होतकरू, गुणवान, तरुण खेळाडूंवर बोली लावून संघ मालकांनी त्यांना आपापल्या संघात निवड करून घेतली. एकूण आठ दिवस चाललेल्या ह्या स्पर्धेत अनेक खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली, संपूर्ण स्पर्धेत ओंकार गावडेने दोन, तर प्रतीक म्हात्रे ह्यांनी एक शतक ठोकले, देवांश तांडेल यांनी सलग तीन अर्धशतके करण्याचा विक्रम केला, विशाल वाघमारे यांनी स्पर्धेत हट्रिक करण्याचा मान मिळवला.स्पर्धेचा अंतिम सामना चिताज सुपरकिंग्ज विरुद्ध हायरीच सुपरस्ट्रायकर्स ह्या दोन संघांमध्ये झाला. प्रथम नाणेफेक जिंकून चिताज सुपरकिंग्ज संघाने फलंदाजी स्वीकारली सलामीवीर प्रतीक म्हात्रेच्या धुंवाधार फलंदाजीने मैदानात धावांचा पाऊस पडला. आपले शतक पूर्ण करत संघाची एकूण धावसंख्या 205 वर त्यांनी नेऊन ठेवली. प्रतीकने 58 चेंडूंमध्ये 104 धावा काढल्या. 205 धावसंख्येला उतर देताना हायरीच सुपरस्ट्रायकर्स संघ सुरुवातीपासूनच ढासळला. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत त्यांनी तंबूचा रस्ता धरला. 20 षटकांमध्ये त्यांनी 120 धावा केल्या. अंतिम सामना एकतर्फी होत चिताज सुपरकिंग्ज संघ अंतिम विजयी ठरला. संघाचे मालक वेणू वेल ह्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून शतक ठोकणारा प्रतीक म्हात्रे ह्याची निवड करण्यात आली. संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू मालिकावीर म्हणून प्रतीक म्हात्रेला गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ठ फलंदाज म्हणून ओंकार गावडे, तर उत्कृष्ठ गोलंदाज साहील क्षीरसागर, तर उत्कृष्ट शेत्ररक्षक म्हणून शाहिद खान ह्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील मोस्ट इमर्गिंग खेळाडू देवांश तांडेल, मोस्ट प्रोमिसिंग प्लेअर निकुंज विठलानी, तर मोस्ट प्रोमिसिंग ऑलराऊंडर हार्दिक कुरुंगळे ह्यांची निवड करण्यात आली. पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अ‍ॅकेडमीतील विविध होतकरू खेळाडू ज्यांनी आपले स्थान रायगड जिल्ह्यातील संघात प्राप्त केले आहे अशा सर्व खेळाडूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेतील उपविजेता संघ हायरीच सुपर स्ट्रायकर्स, तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो लावाज रॉयल्सचा संघ. पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अ‍ॅकेडमीचे अध्यक्ष रवींद्र नाईक ह्यांनी स्पर्धेचे पुरस्कर्ते टीव्हीएस प्रियांकाचे मालक सुबोध जैन, लावाज लुब्रिकंटचे श्री. खारोल, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे पदाधिकारी, सर्व उपस्थित मान्यवरांचे, पालकांचे, प्रेक्षकांचे आभार मानले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष धनराज पाटील, मुख्य प्रशिक्षक सागर कांबळे, महाराष्ट्र महिला संघाचे प्रशिक्षक शंकर दळवी, महेंद्र भातीकरे, सचिन नागपाल, सुरेंद्र भातीकरे, सुमेध कांबळे ह्यांनी मेहनत घेतली. संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून चंद्रकांत म्हात्रे, अ‍ॅड. पंकज पंडित, विवेकानंद तांडेल यांनी, तर सुदेश पुराडकर ह्यांनी गुण लेखक म्हणून काम पाहिले. भविष्यात अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून रायगड जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम सर्वांना सोबत घेऊन करू, असे पीसीएसएचे अध्यक्ष रवींद्र नाईक ह्यांनी सांगितले.

……………………………………………………..   ……

रायगडचा उद्योन्मुख क्रिकेट खेळाडू प्रतिक म्हात्रे

पेण : ग्रामीण विभागातील भाल-विठ्ठलवाडी गावचा प्रतीक प्रवीण म्हात्रे या 20 वर्षीय युवा खेळाडूने पनवेल येथील पीपीएल तथा पनवेल प्रीमिअर लीग स्पर्धेत चिताज सुपर किंग या संघाकडून खेळताना 20 षटकाच्या अंतिम सामन्यात 42 चेंडूंत 8 चौकार, 6 षटकार अशी धुंवाधार फलंदाजी करत वेगवान शतक झळकावीत आपल्या संघाला स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. त्याच्या या उत्कृष्ट खेळामुळे स्पर्धेतील मालिकावीर व अंतिम सामन्यातील सामनावीर अशी दोन पारितोषिके देऊन त्याला गौरविण्यात आले. त्याला चार वेळा मॅन ऑफ दि मॅचचा पुरस्कार मिळालेला आहे. आता या गुणवान खेळाडूला जे.एस.डब्ल्यू कंपनी व समाजातील धनिक व्यक्तींनी सिझन क्रिकेट खेळण्यासाठी आर्थिक सहकार्य करावे, जेणेकरून पेणचा हा युवा गुणवान खेळाडू रणजी, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या खेळाची चमक दाखवेल अशी मागणी क्रिकेटप्रेमी जनतेकडून करण्यात आलेली आहे. त्याचे वडील प्रवीण म्हात्रे सध्या कोचिंग क्लासद्वारे आपल्या कुंटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असून, मुलाच्या क्रीडागुणांनाही पाठिंबा देत त्याला पुढे आणत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply