लढ्यासाठी जोमाने कामाला लागा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी उरण द्रोणागिरी नोड येथील भागूबाई चांगू ठाकूर विद्यालयातील सभागृहात शुक्रवारी (दि. 28) सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली. या बैठकीत बोलताना समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासाठी 10 जून रोजी मानवी साखळी आणि 24 जून रोजी सिडको भवनाला घेराव घालण्यात येणार आहे. या व्यापक लढ्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले.
भूमिपुत्रांचे कैवारी दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिलेच पाहिजे, अशी आग्रही आणि ठाम भूमिका येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी, स्थानिक आणि लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. त्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची बैठक द्रोणागिरी नोड येथे झाली.
या बैठकीस समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उरणचे आमदार महेश बालदी, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, काँग्रेसचे संतोष केणे, जेएनपीटी कामगार विश्वस्त भूषण पाटील, मनसेचे अतुल भगत, कामगार नेते सुरेश पाटील, चंद्रकात घरत, सुधीर घरत, माजी सभापती नरेश घरत, किरीट पाटील, वैजनाथ ठाकूर, जे. डी. तांडेल, नीळकंठ घरत, जयविंद कोळी, कौशिक शाह, प्रकाश ठाकूर, मुकुंद गावंड, विनोद म्हात्रे, सुनील पाटील, दीपक भोईर, चिरनेरचे प्रशांत ठाकूर, शशी पाटील, भावना घाणेकर, रेखा घरत, सीमा घरत, राणी म्हात्रे, निर्मला घरत, माजी सरपंच महेश कडू, प्रेमनाथ ठाकूर, नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
10 व 24 जून रोजी होणार्या एल्गारासाठी गावोगावी व पंचायत समिती गणनिहाय बैठकांचे आयोजन करा. तेथे आम्ही नागरिकांना मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहोत.
प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे या मागणीसाठी सर्वांनी राजकीय चपला बाजूला ठेवून एकजुटीने लढा देऊ या, असे सांगून आपला आवाज मुंबई, महाराष्ट्रासह दिल्लीपर्यंत पोहचवून ‘दिबां’च्या नावाला मान्यता मिळविण्यासाठी सार्यांनी एकसंघ होऊ, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद केले.
दरम्यान, या आंदोलनाला आगरी, कोळी, कराडी, एससी, एनटी समाजासह मारवाडी समाजाचाही मोठा पाठिंबा मिळाला असल्याचे दिसून येत आहे.