Breaking News

बॉम्बे टू गोवा @52; कुठूनही प्रवास सुरू करावा… मस्त धमाल..!!

उत्कृष्ट विनोदी चित्रपटाची व्याख्या काय? रात्री झोपेत जरी आठवला तरी चेहर्‍यावर मंद स्मित हास्य यायला हवे. सकाळी लवकर उठून त्यातील काही विनोदी प्रसंग यू ट्यूबवर कधी एकदा पाहतोय असं वाटायला हवे. आणि मग संपूर्ण दिवसभर ते धमाल प्रसंग डोळ्यासमोर येत येत आपला मूड फ्रेश रहायला हवा.
बॉम्बे टू गोवा अगदी अस्साच धमाल पिक्चर. कधीही कुठूनही कसाही आणि कितीदाही पहावा मस्त मनोरंजन करतो, नवीन ऊर्जा देतो. ’कॉमेडीचे हवं तेवढे कॅप्सूल’ म्हणजेच हा चित्रपट. (जगभरातील अनेक भाषांत असे अनेक विनोदी चित्रपट आहेत. मूकपटापासून ओटीटीपर्यंत हा मजेशीर प्रवास सुरू आहे.)
’बॉम्बे टू गोवा’ मुंबईत प्रदर्शित झाला 3 मार्च 1972 रोजी. तब्बल बावन्न वर्ष झालीदेखील. मेन थिएटर अलंकार होते आणि पिक्चर एन्जॉय करण्यासारखे असल्याने थिएटरवरचा हाऊसफुल्लचा फलक आणि आत हास्याचे फवारे, फुलबाजे कायम राहिले.
तो विनोदवीर मेहमूदचा काळ होता. पिक्चरमध्ये तो हमखास हसवणार याची पब्लिकला हमी होती (आणि तो आपल्यापेक्षा जास्त भाव खाऊन जातो म्हणून अनेक बड्या हीरोंनीच त्याचा आपल्या चित्रपटातून पत्ता कट केल्याचं गॉसिप्स गाजत होते. म्हणून तर मेहमूदच हीरोगिरीकडे वळला.)
’बॉम्बे टू गोवा ’चा निर्माता मेहमूद आणि एन. सी. सिप्पी. त्यांनी ’मद्रास ते पॉन्डेचरी’ या 1966 सालच्या सुपरहिट तमिळ भाषेतील चित्रपटाची रिमेक करायचे ठरवले (चेन्नई शहर त्या काळात मद्रास म्हणून ओळखले जाई.) दिग्दर्शन एस. रामनाथन यांच्याकडे सोपवले. मूळ चित्रपटात नागेश याने रंगवलेली बस कंडक्टरची धमाल भूमिका या चित्रपटात मेहमूदने ’शूटिंगच्या वेळेस त्यात भर घालत घालत रंगवली’. पटकथेनुसार काम करणे काही कलाकारांना योग्य वाटते, तर काही कलाकार एकदा का चित्रपटाची थीम, आपली व्यक्तीरेखा आणि प्रसंग लक्षात आला की त्यात डिशन घेतात. कॉमेडी करणे महाअवघड. भाषेवर आणि टायमिंगवर प्रभूत्व हवे. तेव्हाच त्यांचा विनोद रसिकांपर्यंत पोहचतो. मेहमूद त्यात विनोदवीरांचे विद्यापीठ म्हणून ओळखला जातो आणि ’बॉम्बे टू गोवा’सह त्याने लाखों मे एक, मै सुंदर हू, दो फूल, गरम मसाला, अलबेला (मा. भगवानदादांप्रमाणे मेहमूदचाही ’अलबेला’ नावाचा चित्रपट आहे), कुंवारा बाप (मेहमूदच दिग्दर्शक आहे) हे चित्रपट ’आपलेसे केले’. त्याचे म्हणून हे चित्रपट ओळखले जातात.
हिंदी चित्रपटाची सर्वकालीन पहिली ओळख म्हणजे दोन घटका मस्त करमणूक हवी, टाईमपास हवा, छान विरंगुळा मिळायला हवा, अनेक प्रकारच्या व्यक्तीगत ताण तणाव, दुःख, कटकटी यातून मोकळीक हवी, त्याचा विसर पडावा.
हा प्रवासी चित्रपट. अशा पद्धतीचाही चित्रपट असू शकतो. त्यात कधी असा विनोदी मसालेदार मनोरंजक चित्रपट असतो, तर कधी जोया अख्तर दिग्दर्शित ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’सारखा मैत्रीची धमाल तितकीच भावपूर्ण गोष्ट सांगणारा चित्रपट असतो. अगदी हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा आणि झिम्मा 2देखील एक प्रकारचा प्रवासी चित्रपट. प्रवासी चित्रपटाची उदाहरणे अशी बरीच.  प्रवासात अनेक स्वभाव व वयोगटातील माणसे आणि त्यांच्या अनेक प्रकारच्या गोष्टी यावर चित्रपट.
बॉम्बे टू गोवामध्ये रोमान्स, विनोद, रहस्य, गीत संगीत नृत्य, योगायोग, साप, कोंबडी, पिस्तूल अशा अनेक गोष्टींचा जमून आलेला मसाला. आठवला तरी हसू येते हे त्याचे मोठेच यश. ‘बॉम्बे टू गोवा’च्या अगोदर पडोसन, साधू और शैतान, प्यार किये जा अशा विविध प्रकारच्या विनोदी चित्रपटांनी उत्तम यश प्राप्त केले असल्याने अशा पठडीतील चित्रपटासाठी रसिकांची उत्सुकता वाढली होती. (’पडोसन’वरून मराठीत विनय लाड याने ’पटली रे पटली’, तर ’प्यार किये जा’वरून मराठीत महेश कोठारेने ’धूम धडाका’ बनवला.) ’पडोसन’ इत्यादींच्या यशाने ’संपूर्ण विनोदीपट’ हे समीकरण अधिक एस्टॅब्लिज झाले, अशा चित्रपटांसाठीची रसिकांची मानसिकता व दृष्टिकोन तयार झाला होता आणि या चित्रपटात एक कॉमन फॅक्टर आहे मेहमूद!  त्याचा स्वतःचा हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण झाला होता. विनोदवीरांना कुठेच कोणी फारसं सिरीयसली घेत नसले तरी ते आपलं काम चोख करतात ही एक परंपरा कायम आहे.
बॉम्बे टू गोवा या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अरुणा इराणी नायक नायिका असून शत्रुघ्न सिन्हा, किशोरकुमार, मेहमूद, अन्वर अली, ललिता पवार, केश्तो मुखर्जी, मनोरमा, मुकरी, सुंदर, नासिर हुसेन इत्यादींच्याही भूमिका आहेत. राजेन्द्र कृष्ण यांच्या गीतांना राहुल देव बर्मनचे संगीत आहे. देखा ना हाय रे, दिल तेरा है मै भी तेरी हू ही या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. आणखी एक विशेष म्हणजे ‘बॉम्बे टू गोवा’साठी अमिताभ बच्चनची निवड कशी झाली माहित्येय? खरंतर तेव्हा त्याचा अगदी सुरुवातीचा पडता काळ सुरू होता. सात हिन्दुस्तानी, एक नजर, बन्सी बिरजू वगैरे वगैरे चित्रपट फ्लॉप होत होते, पण याच काळात तो मेहमूदचा भाऊ अन्वर याच्या घरी राहत होता आणि अन्वरने या चित्रपटात ड्रायव्हरची भूमिका साकारली म्हणून अमिताभलाही संधी मिळाली तीदेखील अरुणा इराणीचा नायक म्हणून मिळाली. खरंतर अरुणा इराणी मेहमूदची हुकमी नायिका म्हणून ओळखली जात होती. अरुणा इराणीने बालकलाकार म्हणून या क्षेत्रात पाऊल टाकले. वयात येताना छोट्या छोट्या भूमिका साकारत साकारत वाटचाल करीत असतानाच ’गुनाहों का देवता’मध्ये पहिल्यांदाच मेहमूदसोबत भूमिका मिळाली (त्याच सुमारास रूपेरी पडद्यावरील मेहमूदच्या हुकमी जोडीदार शुभा खोटेचे लग्न झाले, तर मुमताज सहनायिका, प्रमुख नायिका असा प्रवास करीत होती. ती गॅप अरुणा इराणीने भरून निघाली. सिनेमाच्या जगात असे काही होतच असते. कोणती गोष्ट फळेल हे सांगता येत नाही). ’बॉम्बे टू गोवा’त अरुणा इराणी अमिताभची नायिका असेल हा निर्णय मेहमूदचा आणि तो तात्कालिक परिस्थितीतून आलेला). एखाद्या चित्रपटाच्या निर्मीतीत असे अनेक छोटे मोठे घटक गुंतलेले असतात (त्याचेच किस्से होतात) आणि चित्रपट रसिकांना ते जाणून घेण्यात फार इंटरेस्ट असतोच.
पिक्चरमधील बसमधील अमिताभने नाचत नाचत साकारलेले देखा ना हाय रे सोचा ना या गाण्यावर नाचायला त्याला जमेना. नृत्य दिग्दर्शक पी. एल. राज त्याला टेकवर टेक करायला लावत. अखेर तो हैराण झाला आणि मेकअप रूममध्ये जाऊन बसला. मेहमूदने त्याची बरीच समजूत घातली. तरीही तो त्याची विनवणी करीत होता, जमणार नाही. अखेर मेहमूदने एक शक्कल लढवली. अमिताभ तयार होऊन सेटवर येईपर्यंत त्याने अन्य कलाकारांना सांगितले अमिताभचा पहिलाच टेक आम्ही ओके करू आणि तो चांगलाच झाला आहे असे म्हणतच तुम्ही टाळ्या वाजवा. तस्सेच झाले. हे नाटक छान वठले. अमिताभचा आपल्या नृत्याबाबतचा नून्यगंड गेला आणि तो अधिकच आत्मविश्वासाने नृत्य करू लागला. हा किस्सा खुद्द अरुणा इराणीने सांगितला. कलाकार असा घडत असतो असेच म्हणूयात. पिक्चरचे बरेचसे शूटिंग चेन्नईतील (तेव्हाचे मद्रास) विजयवानी स्टुडिओत झाले. मूळ चित्रपटात नसलेला गाडीतून कोंबडी पळाल्याचा प्रसंग ही मेहमूदची कल्पना. तर प्रवासी अनेक प्रकारचे असतात एकादी अशीही (ललिता पवार) हा पंच रंगला. अन्वर गाडी चालवत असतानाच समोर साप येणे, आपण हाती साप घेतलाय हे समजल्यावर मेहमूदची गाळण उडणे असे छोटे छोटे धमाल प्रसंग पाहण्यातही अनेकांचे मस्त मनोरंजन होते. मेहमूद व अन्वर, एक वाहक, एक चालक, एकाचे नाव राजेश तर दुसर्‍याचे खन्ना. एका प्रसंगात गाडीभोवती फेरी मारताना एकमेकांना हाक मारताना राजेश… खन्ना… हा पंच थेटरात प्रचंड धमाल उडवे. पिक्चरमधला मुंबई-गोवा प्रवास असा कधीही, केव्हाही, काहीही घडू बिघडू शकते या गोष्टींनी रंगला.
तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण ‘जंजीर’ (1973)साठी इन्स्पेक्टर विजयच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चनचे नाव पटकथा संवाद लेखक सलिम जावेद यांनी सुचवले असता दिग्दर्शक प्रकाश मेहरानी ‘बॉम्बे टू गोवा’ पाहून अमिताभची निवड केली. यातील त्याचा स्क्रीन प्रेझेंस आणि मारहाण दृश्यातील आत्मविश्वास पाहून प्रकाश मेहरा इम्प्रेस झाले आणि लगोलग त्यांनी अमिताभची निवड केली. या चित्रपटाचे हे देणे खूप महत्त्वाचे आहे. एकाद्या चित्रपटाबाबत असेही काही वेगळे घडत असते. सिनेमाची दुनिया ही अशी बहुरंगी, बहुढंगी. सत्तरच्या दशकात हा चित्रपट त्यानंतर रिपीट रन आणि मॅटीनी शोला पुन्हा पुन्हा प्रदर्शित होताना अनेकांनी तो पुन्हा पुन्हा पाहून एन्जॉय केला. ऐशीच्या दशकात या चित्रपटाची व्हिडीओ कॅसेट उपलब्ध होऊ लागली आणि आता पुढील पिढीतील चित्रपटरसिकांना आवडू लागला. यातील विनोद कालबाह्य झाले नाही. असे करता करता हा चित्रपट आणखी काही पिढ्या ओलांडूनही तितकाच आनंद देत राहिला. आणि देखा है रे हे गाणे जनसामान्यांच्या पिकनिकमध्ये हुकमी असल्यानेही या चित्रपटाची ओळख कायम राहिली. म्हणूनच चित्रपटात गाणी हवीत ती एका पिढीतील चित्रपट पुढील अनेक पिढ्यांत नेत असतात.
पुन्हा एकदा बॉम्बे टू गोवा (2007) या नावासह अशाच पठडीतील चित्रपट आला, पण तो मूळ चित्रपटाची ओळख आणि व्यक्तिमत्व यांचा विसर पाडण्यात यशस्वी ठरला नाही. 2007 साली हा चित्रपट पडद्यावर आला. राजू पेडणेकर दिग्दर्शित या चित्रपटात शक्ती कपूर, टीनू आनंद, दिनेश हिंगू, राजू श्रीवास्तव, सुनील पाल, नवीन प्रभाकर, पेंटल, संजय मिश्रा, विजयराज, असरानी, एहसान कुरेशी, असिफ शेख, विजू खोटे, ज्युनियर मेहमूद इत्यादींच्या भूमिका आहेत. सचिन पिळगावकरने याच ‘बॉम्बे टू गोवा’ची नवरा माझा नवसाचा या नावाने रिमेक केली. चित्रपटाचा क्लायमॅक्स गणपतीपुळे येथे होतो, पण हाही चित्रपट म्हणावा तसा जमला अथवा रंगला नाही. मूळ चित्रपटाचे व्यक्तिमत्व त्याच्या रिमेकला येणं शक्यही नव्हतेच म्हणा. इतकेच नव्हे तर आता ’नवरा माझा नवसाचा 2’ असा सिक्वेल येतोय. या सगळ्यात एक महत्त्वाचं रसिकांची पिढी बदलली तरी बॉम्बे टू गोवाच विविध माध्यमातून (डिजिटल पिढी यू ट्यूबवर आनंद घेत आहे) पाहत असताना त्याची चक्क नक्कल कोण हो पाहिल? अगदी कानडी भाषेतही एकान्दथा या नावाने रिमेक करण्यात आली आणि त्यातही रंगत आली नाही. याचं कारण मेहमूद हा हुकमाचा एक्का होता. त्याला ’चित्रपटातील कॉमेडी म्हणजे काय?’ याचं भान होते. व्यक्तिगत आयुष्यातील दु:ख विसरून जनसामान्यांना लोटपोट हसवणे त्याचा हेतू होता.
आजच्या ओटीटीच्या युगात वेगवेगळ्या निमित्ताने मल्टीप्लेक्समध्ये जुने चित्रपट प्रदर्शित होताहेत. कालची आणि आजची पिढी त्याला गर्दी करतेय. तर मग होऊन जाऊ दे मेहमूदच्या धमाल पिक्चर्सचा एक महोत्सव. त्याच्या अनेक प्रकारच्या व्यक्तीरेखा, गेटअप, विनोदाचे टायमिंग आणि कधी गीत संगीत व नृत्यातील रंगत पहायला मिळेल आणि असाच एक विनोदी चित्रपटांचाही महोत्सव होऊ देत. त्यात मेहमूदच्या काही पिक्चर्ससह चलती का नाम गाडी, दो दुनी चार, बावर्ची, चुपके चुपके, अंगूर असे अनेक चित्रपट एन्जॉय करता येतील. एक मस्त सेलिब्रेशन होईल. पिक्चर पाहणे हा आनंद सोहळाच तर असतो…

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply