Breaking News

पनवेलमध्ये लवकरच क्रिकेट प्रशिक्षण अकादमी -दिलीप वेंगसरकर

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दूरदृष्टी दिली -आमदार प्रशांत ठाकूर
– खेळाचे महत्त्व वाढत स्थानिक पातळीवरही क्रीडा भावना रुजली -अविनाश कोळी
– भारतातील युवा जगाची ताकद -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमध्ये लवकरच क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरू होणार आहे. या अकादमी मधून पनवेलमधील खेळाडू आयपीएल तसेच भारतीय संघामध्ये खेळतील, असा विश्वास भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांनी येथे व्यक्त केला. तसेच हे प्रशिक्षण विनामूल्य असणार असून हे आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर यांच्या मेहनतीमुळे शक्य झाले आहे, असेही त्यांनी या वेळी नमूद करत क्रिकेट खेळाडूंना करिअर करण्याची संधी प्राप्त होत असल्याचे अधोरेखित केले. तर कणखर नेतृत्व व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीतून देशात विकासाची क्रांती आणि त्या अनुषंगाने देशाला सक्षम करण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाचा झालेला विकास याबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात ’नमो चषक’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पनवेल विधानसभा मतदार संघात झालेल्या नमो चषक 2024 स्पर्धत 01 लाख 13 हजार 278 स्पर्धकांनी सहभाग घेऊन महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकाविला आहे. या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ पनवेल मधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी मोठ्या दिमाखात झाला.
या महोत्सवात नमो खारघर मॅरेथॉन, नमो खारघर हिल ट्रेकिंग, नमो सायक्लोथॉन, दिवस रात्र टेनिस क्रिकेट, चित्रकला, वक्तृत्व, फुटबॉल, कुस्ती, कबड्डी, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, ज्युडो, किक बॉक्सिंग, कॅरम, तायक्वांदो, खो-खो, रस्सीखेच, रांगोळी, गायन, नृत्य, अशा 21 प्रकारात स्पर्धा झाल्या. त्यानुसार सहभागी स्पर्धकातून 2 हजार 420 विजेत्यांना एकूण रोख रक्कम 13 लाख 67 हजार 300 रुपये, तसेच सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ते बोलत होते.
दिलीप वेंगसरकर यांनी पुढे बोलताना, मेहनतीला पर्याय नाही त्यामुळे शॉर्टकट घेऊ नका तरच मेहनतीचे फळ गोड मिळेल, असा सल्लाही नवोदित खेळाडूंना दिला. ते पुढे म्हणाले की, माझी ही चौथी अकॅडमी आहे. यापूर्वीच्या अकॅडमीतून दर्जेदार क्रिकेटपटू तयार होऊन आयपीएल तसेच इतर स्पर्धेमध्ये खेळत आहेत. त्याचप्रमाणे पनवेलच्या अकॅडमितही खेळाडूला प्रशिक्षित प्रशिकांकडून प्रशिक्षण देण्यात येईल, आणि ते सुद्धा विनामूल्य. या वेळी त्यांनी नमो चषक स्पर्धेच्या भव्य आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करताना एका स्पर्धेत एक लाखाहून अधिक स्पर्धक सहभाग घेतात हे माझ्या ऐकवात पण नाही, असे सांगतानाच अप्रतिम असा हा महोत्सव झाला, असल्याची पोचपावती त्यांनी आयोजकांना दिली. पुढे बोलताना त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आवर्जून उल्लेख करत त्यांना मी जवळून ओळखतो त्यांचे कार्य खूप मोठे आहे आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर हे समाजहिताचे काम करत आहेत, असेही दिलीप वेंगसरकर यांनी गौरवोद्गार काढले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. फक्त देशाचा विकास नाही तर देशाचे नाव अभिमानाने संपूर्ण विश्वात आदराने घेतला जात आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहोरात्र सेवेमुळे शक्य झाले आहे आणि त्यामुळे आज आपला भारत देश जगात महासत्तेच्या दिशेने मार्गक्रमण करत असून हे सर्व आपण देशवासीय म्हणून आपल्याला अभिमानास्पद आहे. त्यांनी जगात भारताचे नाव उज्ज्वल करण्याबरोबरच देशाचा केलेला सर्व क्षेत्रातील विकास भारतासह जगाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या जनसमर्पित कार्याला अभिवादन करण्यासाठी आणि नवोदित खेळाडू व कलाकारांना वाव मिळण्यासाठी नमो चषक या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. पनवेल विधानसभा मतदार संघात झालेल्या या महोत्सवात स्पर्धकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला. त्यामुळे राज्यात 288 असलेल्या विधानसभा मतदार संघात पनवेलने चौथा क्रमांक पटकाविला आहे. नीटनेटके आणि यशस्वी नियोजनामुळे खेळाडू स्पर्धकांनाही या महोत्सवाचा आनंद घेत एक पर्वणी मिळाली. तुमच्या सर्वांच्या सहभागाने हि स्पर्धा यशस्वी झाली असे सांगतानाच त्याप्रती सर्वांचे आभार व्यक्त केले. देशात प्रत्येक क्षेत्रात विकासाचा आलेख उंचावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा विमानतळ साकारत त्या भागात अटल सेतूची उभारणी करण्याचे काम त्यांनी केले आणि त्यासाठी आपले नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कामी आला आहे. सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, खेळाडू, शेतकरी, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक, कामगार, व्यवसायिक, समाजासाठी आपले आयुष्य वेचणार्‍या व्यक्ती, अशा प्रत्येक घटकाचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. असेही त्यांनी सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा गौरव केला. या नमो चषक महोत्सवात मिळालेला सहभाग आम्हाला आणखी एक प्रेरणा देत असून दरवर्षी हा महोत्सव आयोजित करण्यात करणार असल्याचे नमूद करून खेळाडू व कलाकारांच्या पाठीशी यापुढेही कायम राहण्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आश्वासित केले.
खेलो भारतच्या माध्यमातून आपला भारत देश जगात खेळाच्याही क्षेत्रातही नैपुण्य मिळवत आहे, त्याच धर्तीवर नमो चषकाच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाचे महत्त्व वाढत असताना स्थानिक पातळीवरही प्रत्येकामध्ये क्रीडा भावना रुजली आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केले. संपूर्ण जगात होणार्‍या स्पर्धेत भारतातील खेळाडू आणि खेळ चमकत आहे ते दुरदृष्टी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे. त्यांनी देशातील खेळाडूंसाठी अनेक योजना अंमलात आणल्या आणि त्याचा परिपाक म्हणून आपल्या देशाने जगातील क्रीडा क्षेत्रातही नैपुण्य प्राप्त केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर यांच्या नेतत्वाखाली सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे पनवेल विधानसभा मतदार संघाने 288 विधानसभा क्षेत्रातून चौथा क्रमांक पटकावला आहे हे आपल्या सर्व पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब आहे असे सांगतानाच आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर तसेच, युवा मोर्चाचे अध्यक्ष मयुरेश नेतकर आणि सहकार्‍यांची मेहनत आहे, असेही त्यांनी म्हंटले.
या वेळी महापालिकेचे माजी सभागृह नेते व पनवेल विधानसभा नमो चषक महोत्सवाचे प्रमुख संयोजक परेश ठाकूर यांनी आपल्या भाषणात, युवा शक्तीत ऊर्जा असते ही ऊर्जा सामाजिक कार्यासाठी महत्वाची असून भारतातील युवा जगातील ताकद आहे, असे सांगून ही ऊर्जा सामाजिक स्वरूपात व्यक्त झाली पाहिजे असे म्हंटले. तब्बल एक महिना ही स्पर्धा चालली. राज्यातील 288 विधानसभा क्षेत्रात ही झाली. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात या नमो चषकाचे कौतुक होत आहे. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात व्हावी असे निर्देश आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले होते त्या अनुषंगाने युवा मोर्चावर दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या मयुरेश नेतकर व सहकार्‍यांनी पार पाडली असे सांगून पनवेलचे क्रीडा विश्व मोठे करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशिल रहावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
या वेळी प्रास्ताविकातून युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी या स्पर्धेचा आढावा मांडला. तसेच या महोत्सवासाठी मोलाचे सहकार्य करणारे आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद दिले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आणि युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे या यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले. या सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन वैभव बुवा आणि धनश्री यांनी केले.
या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते सी. सी. भगत, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अरुणकुमार भगत, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अमर पाटील, विकास घरत, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका सुशीला घरत, मोनिका महानवर, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, डिजिटल क्रिएटर यशश्री राव, डायनी पंडित, शिवानी कांबळे, पालवी कदम, भाग्यश्री, तायक्वांदोचे राष्ट्रीय सचिव सुभाष पाटील, डॉ. संतोष आगलावे, प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, साधना पवार, क्रीडा सेलचे जिल्हाध्यक्ष विनोद नाईक, ऍड. चेतन जाधव, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, विद्या तामखेडे, मंदार पनवेलकर, सचिन चौधरी, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अभिषेक भोपी, दिनेश खानावकर, युवा मोर्चा शहर संयोजक रोहित जगताप, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, कामोठे अध्यक्ष तेजस जाधव, खारघर अध्यक्ष नितेश पाटील, कळंबोली अध्यक्ष गौरव नाईक, देवांशू प्रभाळे, कोमल कोळी, यांच्यासह पदाधिकारी, खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply