Breaking News

पनवेलमधील सात गावांच्या घरमालकांना मिळणार घराखालील जागेचा मालकी हक्क

आमदार प्रशांत ठाकूर आणि आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते सोमवारी प्रॉपर्टी कार्डचे वाटप

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेत समविष्ट झालेल्या सात गावांमधील घरमालकांना त्यांच्या घराखालील जागेचा मालकी हक्क मिळणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते 725 जणांना सोमवारी (दि.11) प्रॉपर्टी कार्ड अर्थात मिळकत पत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे.
महापालिका होण्यापूर्वी ग्रामपंचायत हद्दीत राहणार्‍या आपल्या पूर्वजांनी आपली घरे गावठाण हद्दीत बांधली होती. त्याच्या नोंदी शासकीय मालमत्ता पत्रकात झालेल्या नसतात. त्यामुळे त्या घरांचा मालकी हक्क वारसांना मिळालेला नसतो. तो मिळावा यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे पत्र देऊन मागणी केली होती. जिल्हाधिकार्‍यांनी 4 फेब्रुवारी 2021 रोजी अधिसूचना काढून पनवेल महापालिका हद्दीतील 24 गावांच्या गावठाणांचे भूमापन करण्याचे आदेश दिले होते.
भूमी अभिलेख विभागाने याबाबतचा सर्व्हे सुरू केला आहे. मौजे बीड, तळोजा मजकुर, चाळ, नागझरी, आडीवली, धानसर व करवले बुद्रुक या सात गावांचे गावठाण क्षेत्र मोजण्याचे व चौकशीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार 725 मिळकत पत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. या मिळकत पत्रिकांचे वाटप तळोजा मजकूर येथील शिव मंदिरात सोमवारी संध्याकाळी 4 वाजता आमदार प्रशांत ठाकूर व महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply