उरण : बातमीदार
तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अपघाताची मालिका सुरूच आहे. मंगळवारी रात्री 8 वाजता झालेल्या अपघातात निखिल चंद्रकांत कडू (21) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तीन दिवसातील हा चौथा अपघात. यामध्ये चार जणांचा बळी गेला आहे.
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अपघात मालिकेमध्ये मंगळवारी चौथा बळी गेला आहे. निखिल चंद्रकांत कडू असे मृत तरुणाचे नाव असून, नवी मुंबई येथून उरणकडे येत असताना राज्य महामार्ग 54 वर वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी सिमेंटच्या भिंतीला धडकल्याने अपघात झाला. त्यात निखिलचा मृत्यू झाला.
निखिलच्या मोठ्या भावाचे सोमवारी लग्न झाले होते आणि मंगळवारी लग्न प्रीत्यर्थ पूजेचे आयोजन करण्यात आले होते, तर याच दिवशी वडिलांचा वाढदिवस असल्याने निखिल नवी मुंबई येथून केक घेऊन घरी परतत असताना हा अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकावर आदळून अपघात झालाय. घरामध्ये आनंदोत्सव साजरा होत असताना निखिलच्या अपघाताने कडू कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. गेल्या तीन दिवसांपासून अपघाताची मालिका सुरू असून बळी जाणार्यांचा आकडा वाढत चालल्याने उरण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.