पावसाळ्यापूर्व कामे खोळंबली; नागरिकांमध्ये नाराजीचा सूर
पाली : प्रतिनिधी
नगरपंचायतीचा दर्जा मिळालेल्या पाली (ता. सुधागड) नगरपंचायत हद्दीतील नालेसफाई पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते, मात्र अजूनही येथील नालेसफाईच्या कामाला मुहूर्त मिळत नाही. त्यामुळे पालीकर जनतेतून नाराजीचा सूर आहे.
अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेले पाली शहर समस्यांमुक्त व सोईसुविधांनी परिपूर्ण असावे यासाठी पाली नगरपंचायत महत्त्वाची भूमिका बजावेल असे सार्यांना वाटत होते, मात्र विकासकामांना गती मिळत नसल्याने येथील जनतेत नाराजीची भावना दिसून येतंय. पालीत अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येतंय. पाणी बॉटल, प्लास्टिकच्या पिशव्या, घरगुती कचरा व गाळ यामुळे पालीतील नाले व गटारे ठिकठिकाणी तुंबले आहेत. त्यामुळे सर्वत्र घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्याच्या त्रासामुळे जनतेसह भाविकही बेजार झाले आहेत.
पालीमधील भोई आळी, आगर आळी, राम आळी, खडक आळी, कुंभार आळी, मधली आळी, सोनार आळी, कासार आळी, बल्लाळेश्वर नगर व बल्लाळेश्वर मंदिर परिसरातील नाले व गटारे तुंबली आहेत. साठलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात घाण व दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. नालेसफाई व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांनाही या घाणीचा व दुर्गंधीचा त्रास होत आहे. पावसाळ्यात तुंबलेले नाले व गटारांतील सांडपाणी रस्त्यावर येवून पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी या गटारे व नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी पालीतील नागरिक करीत आहेत.
नाले आणि गटारांची दुरवस्था
पालीतील अनेक नाले व गटारांची कित्येक वर्षांपासून दुरुस्तीच झालेली नाही. बहुतांशी नाले व गटारे मोडकळीस आले आहेत. काही नाल्यांमध्ये तर झाडे आणि गवत उगवले आहे. तर काही नाले, गटारे गाळ व मातीने भरली आहेत. नालेसफाई वेळीच झाली नाही तर पावसाळ्यात काही वस्त्यांत गटाराचे पाणी घरात शिरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, हे निश्चित.