‘सिरम’चे अदर पुनावाला यांचे स्पष्टीकरण
मुंबई : प्रतिनिधी
सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्या मुलाखतीवरून लसींच्या पुरवठ्याबाबत बर्याच घडामोडी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याबाबत अखेर पुनावाला यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही केंद्र सरकारसोबत मिळून काम करतोय आणि आम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुनावाला यांनी एक पत्र ट्विट करीत म्हटले आहे की, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याने मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. सर्वप्रथम लस उत्पादन ही एक विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे रात्रीतून उत्पादन वाढविणे शक्य नाही. आपल्याला हेदेखील समजून घेण्याची गरज आहे की भारताची लोकसंख्या मोठी आहे आणि सर्व प्रौढांसाठी पुरेसे डोस तयार करणे हे सोपे काम नाही. अगदी प्रगत देश आणि कंपन्या तुलनेने कमी लोकसंख्या असतानाही संघर्ष करीत आहेत.
पुनावालांनी पुढे म्हटले आहे की, दुसरे म्हणजे आम्ही गेल्या वर्षी एप्रिलपासून भारत सरकारबरोबर काम करीत आहोत. आम्हाला वैज्ञानिक, नियामक आणि आर्थिक असो सर्व प्रकारचे समर्थन मिळाले आहे. आजपर्यंत आम्हाला एकूण 26 कोटींपेक्षा जास्त डोसची ऑर्डर प्राप्त झाली. त्यापैकी आम्ही 15 कोटींहून अधिक डोस पुरविले. आम्हाला 100 टक्के आगाऊ रक्कमदेखील मिळाली आहे. पुढील काही महिन्यांत राज्य आणि खासगी रुग्णालयांसाठी आणखी 11 कोटी डोस पुरवले जातील. आम्हाला हे समजते की प्रत्येकाला लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी असे वाटते. आमचेही तेच प्रयत्न आहेत आणि आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. आम्ही आणखी काम करू आणि कोविडविरुद्धचा भारताचा लढा मजबूत करू.