नागोठणे : प्रतिनिधी
नागोठणे – रोहे मार्गातील आंबेघर फाटा ते आमडोशी फाटा दरम्यानचा रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून चालणार्या एसटी बसेससाठी हा रस्ता बंद करून त्या वाकण- आमडोशी मार्गावरून चालवण्याची परिस्थिती एसटी महामंडळावर ओढवली आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. नागोठणे-रोहे हा साधारणतः अठरा किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. या मार्गात आंबेघर फाटा ते आमडोशी फाटा हा अडीच ते तीन किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून या रस्त्यावरून वाहने चालविणे चालकांना जीवघेणे ठरत आहे. अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हा रस्ता येत असून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे सोपस्कार संबंधित खात्याच्या वतीने करण्यात येत असले तरी, पाऊस चालू झाल्यानंतर जुलै महिन्यात पुन्हा या रस्त्याची झालेली दुर्दशा पाहण्याचे ’भाग्य ’ प्रवासी तसेच वाहनचालकांच्या नशिबी येत असते. या मार्गात एमआयडीसी फाट्यालगत रस्त्यावर पडलेल्या काही खड्ड्यांची खोली दीड ते दोन फूट इतकी आहे. या मार्गावरून नागोठणे ते रोहे दरम्यान दिवसभरात अनेक एसटी बसेसची वाहतूक होत असते. या खड्ड्यांमुळे या गाड्यांच्या दुरुस्तीचा खर्च सोसावा लागत असल्याने रोहे आगाराने या मार्गावरून एसटी बसेस नेणे बंद करून त्या दोन दिवसांपासून आमडोशी मार्गाने चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वाधिक फटका वरवठणे तसेच वेलशेत, आंबेघर आणि रिलायन्सच्या परिसरातील गावांना बसला आहे. या गावांतील प्रवाशांना रोहे येथे जाण्यासाठी नागोठणे एसटी बसस्थानकात येऊनच प्रवास करण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून हा रस्ता कायमस्वरूपी खड्डेमुक्त कसा होईल यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी अपेक्षा वाहनचालकांमधून व्यक्त केली जात आहे.