Breaking News

चित्रपट प्रसिद्धीचा वाढता विळखा

पोस्टर ते डिजिटल

स्थळ : दादरमधील एक मध्यवर्ती भागातील हॉल, निमित्त : घरत गणपती या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीचा सोहळा. चित्रपटाचे नाव व विषयानुसार श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक व कलाकार अगोदर श्रीसिद्धिविनायक मंदिरात जाऊन पूजा करतात व आशीर्वाद घेतात. मग हॉलमधील श्रीगणेशाची पूजा होते. चित्रपटाचा ट्रेलर लक्षवेधक वाटतो. कोकणाची संस्कृती आणि चित्रपटाची थीम यांचा सुरेख मेळ घातल्याचे दिसते आणि चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढते. त्यानंतर अश्विनी भावे, अजिंक्य देव, शुभांगी गोखले, परी तेलंग, शरद भुताडीया इत्यादी कलाकार एकामागोमाग एक मुलाखती देतात. यासाठी लागणारी क्षमता व सातत्य त्यांच्यात होते हे विशेष. पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करीत आहेत. नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने निर्माण झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  या घरत कुटुंबाच्या सदस्यांनी श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. या चित्रपटातील कलाकारांनी सांगितलं की, ‘आपलं प्रत्येकाचं गणपती बाप्पाशी खास असं नातं असतं. गणपतीच्या वेळी केलेली धमाल वेगळीच असते. हीच धमाल दाखवताना गणपती बाप्पाच्या कृपेने प्रत्येकाला नात्यांचे सूर कसे गवसणार? हे पहायला मिळणार आहे. हा चित्रपट पाहताना निखळ आनंद तर मिळेलच, पण या चित्रपटाची गोष्ट प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची आणि प्रेमळ नात्यांची आठवण करून देईल हा विश्वास कलाकारांनी व्यक्त केला. हा चित्रपट प्रत्येकाला आपल्या घरातला वाटेल. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर उत्तम कथानक व भव्यदिव्यता दिसेल असा विश्वास दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी व्यक्त केला.राजदत्त दिग्दर्शित ’अर्धांगी (1985) हा अजिंक्य देवचा, तर प्रभाकर पेंढारकर दिग्दर्शित शाब्बास सुनबाई (1986) हा अश्विनी भावेचा पहिला चित्रपट. ’अर्धांगी’च्या अतिशय कौटुंबिक वातावरणात पार पडलेल्या पुणे शहरातील प्रीमियरला मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकाराना आमंत्रित केले होते, तर शाब्बास सुनबाईचा प्रीमियर मुंबईतील कोहिनूर थिएटरमध्ये (आताचे नक्षत्र) रंगला. विशेष उल्लेखनीय गोष्ट, बाळासाहेब ठाकरे यांची या प्रीमियरला विशेष उपस्थिती होती. सुलोचनादीदीही या वेळी उपस्थित होत्या. तेव्हाची चित्रपट प्रसिद्धीची पद्धत आणि आता माध्यमे वाढल्यानंतरची पद्धत यातील फरक या दोघांनी चांगलाच अनुभवलाय. या काळात मुद्रित माध्यम, मग दूरचित्रवाणी, मनोरंजन उपग्रह वाहिन्या असे करत करत आज आपण ऑनलाईन जगात अर्थात डिजिटल युगात आलो आहोत. सगळं कसे झटपट, पटपट. आजचे युग कसे आहे? एखाद्या नवीन चित्रपटाचा टीझर वा ट्रेलर प्रकाशित होणार आहे असे समजते न समजते, त्याच्या प्रकाशनचा सोहळा एकाद्या मल्टीप्लेक्स अथवा पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू असतानाच त्या टीझर/ट्रेलरचे दर्शन मोबाईलवर घडतेही, इतकेच नव्हे तर आजचा युवा वर्ग त्यावर आपली बरी-वाईट उत्फूर्त प्रतिक्रियाही देतात (कधी हक्काने ट्रोल करतात). चित्रपट माध्यम व व्यवसायात पडद्यावर आणि पडद्याबाहेर रंग, रेषा यांचा प्रवास अगदी सुरुवातीपासूनच आणि त्याचा टप्प्या हा असा डिजिटल मीडिया आहे. तुम्हाला थोडसं फ्लॅशबॅकमध्ये नेतो… चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांना या चित्रपटाच्या खेळाची माहिती व्हावी यासाठीच वृत्तपत्रात जाहिरात दिली जाई. तेच महत्त्वाचे माध्यम होते. आपल्या देशातील चित्रपटाचे पहिले सादरीकरण झाले त्या लूमिनी बंधूनी फ्रान्समधून आणलेल्या ’अरायव्हल ऑफ ट्रेन’ (7 जुलै 1896 रोजी वॉटसन हॉटेल, दक्षिण मुंबई) या केवळ काही मिनिटांच्या लघुपटाची टाईम्स ऑफ इंडियातील जाहिरात ही आपल्याकडील चित्रपटाची वृत्तपत्रातील पहिली जाहिरात होय. सोशल मीडियात आता ती पाह्यला मिळतेय. दादासाहेब फाळके यांनी हिन्दुस्तानात ’राजा हरिश्चंद्र’ (3 मे 1913) या चित्रपटाव्दारे मुहूर्तमेढ रोवली, त्याचीही टाईम्स ऑफ इंडियात जाहिरात आली. तीही आज डिजिटल युगात पहायला मिळतेय. आजच्या पिढीतील चित्रपट रसिकांनी जुन्या काळातील चित्रपट विश्वात रस घेतल्यास त्यांना चित्रपटाचा इतिहास व भूगोल नक्कीच माहीत होईल. चित्रपट म्हणजे केवळ ग्लॅमर, गॉसिप्स, गल्ला पेटी आणि टाईमपास गप्पा नाहीत हे त्यातून लक्षात येत जाईल. त्यात एक वाटचाल चित्रपट प्रसिद्धीची आहे. यातीलच एक गोष्ट सांगतो, ’राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाला सुरत शहरात फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून दादासाहेबांनी एक पत्रक काढले आणि ते सूरतमध्ये वाटले. त्यात म्हटले होते, फक्त बे अनामा पौना इंच चौडुं बे माईल अने बे माईल लांबू (फक्त दोन आण्यात पहा, दोन मैल लांब आणि फक्त पाऊणे इंच रुंदीचे 57000 फोटोग्राफ्स). या पत्रकाचा प्रभाव पडला आणि चित्रपटाला गर्दी झाली. त्या काळात मग हळूहळू देशातील अनेक शहरात आणि मग गावातही अशी एकाद्या घोषवाक्याने चित्रपटाच्या नावाची पत्रके वाटण्याची संस्कृती आली आणि ती दीर्घकाळ रूजली. कुठे हातगाडीवर पोस्टर लावून, तर कुठे घोडागाडी वा बैलगाडीला पोस्टर लावून शहरभर अथवा गावभर रंगबिरंगी पत्रके वाटली जात. हातगाडीवाला भोंगा घेऊन जोरात बोले, तर घोडागाडीत त्या जोडीला ताशा वाजवला जाई. आजसाठी ओलांडलेल्या आपल्या लहानपणीचे असे दिवस एव्हाना नक्कीच आठवले असतील. चित्रपट अनेक प्रकारे भावविश्व व्यापून टाकते. आपल्या देशात चित्रपट व क्रिकेट समाजाच्या सर्वच स्थरांत मुरलयं त्यात जुन्या आठवणींचा ठेवा खूपच मोठा व महत्त्वाचा आहे.
आपल्या देशातील चित्रपटाचे पहिले पोस्टर बनले ते ’सैरंध्री’ (1933) या चित्रपटाचे. बाबुराव पेंटर यांनी ते बनवले होते आणि दक्षिण मुंबईतील धोबीतलाव येथे आज जेथे मेट्रो चित्रपटगृह आहे, त्याच्याबरोबर समोर ते लावले आणि विशेष म्हणजे ते पहायला रसिकांची गर्दी होऊ लागली. त्यात नवेपण व कुतूहल होते. एक प्रकारे चित्रपट प्रसिद्धीत आता पोस्टर कला आली आणि आता चित्रकाराना आपली कला दाखवण्याची खूप मोठी व चांगली संधी मिळाली. चित्रपट बोलू लागला होता. व्ही. शांताराम यांचा ’अयोध्येचा राजा’ (1932) हा पहिला मराठी बोलपट तर अर्देशीर इराणी यांचा ’आलम आरा’ (1931) हा पहिला हिंदी बोलपट होय. तोपर्यंत मूकपटाची वाटचाल सुरू होती. चित्रपट बोलू लागला तरी आणखी चार पाच वर्षे मूकपट निर्माण झाले. हा प्रवास विकसित होताना चित्रपट निर्मितीची केंद्रेही वाढली आणि अन्य प्रादेशिक भाषांतील चित्रपट निर्मितीही आकार घेऊ लागली. महाराष्ट्रात मुंबई व कोल्हापूर तर देशात तेव्हा मद्रास (आताचे चेनई), कलकत्ता (आताचे कोलकत्ता), लाहोर (आता पाकिस्तानात) ही तेव्हाची चित्रपट निर्मितीची प्रमुख केंद्र होती. जसजसे हे प्रमाण वाढले तसे प्रत्येक ठिकाणी चित्रपटासह रंग रेषांचाही प्रवास सुरू झाला. बराच काळ चित्रपट कृष्ण धवल म्हणजेच ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट स्वरूपात निर्माण होई, पण पोस्टर, मग मोठी होर्डींग्स, थिएटर्सवरची होर्डिंग्स मात्र रंगीत असे. विशेष म्हणजे थिएटर डेकोरेशन पाहण्यात विशेष रस घेणाराही चित्रपट शौकिन (की व्यसनी?) होता. मुंबईत त्या काळात प्रामुख्याने गिरगावातील मॅजेस्टिक (1972-73 साली बंद), ऑपेरा हाऊस, इंपिरियल, मिनर्व्हा (जुने व नंतरचे) अशा अनेक चित्रपटगृहांवरचे पोस्टर डेकोरेशन पाहण्यास रसिक गर्दी करत. मी गिरगावात लहानाचा मोठा होताना या चित्रपटगृहावरील थिएटर डेकोरेशन एन्जॉय केलीत. मॅजेस्टीक चित्रपटगृहावरची मराठी चित्रपट व हिंदी पौराणिक चित्रपटाचे डेकोरेशन आवर्जून पाहण्यासारखे असते. इंपिरियल थिएटरवरचे डेकोरेशन पाहून शेजारच्या गल्लीत शिरताच नाझ थिएटरवरचे डेकोरेशन लक्ष वेधून घेई. ते दिवसच वेगळे होते. डेकोरेशन पाहूनही चित्रपट कसा असेल याचाही निष्कर्ष काढला जाई.
पोस्टर रेखाटण्यातील त्या काळातील महाराष्ट्रीय नावे म्हणजे, जी. कांबळे, नाना लोंढे ( यांची दादर येथे नवरुप चित्र नावाची जाहिरात संस्था होती), एन.आर. भोसले ( सुदेश भोसले याचे वडील), जय आर्ट, गुरुजी बंधू, जी. कांबळे…. त्या काळात चित्रपती व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांची पोस्टर व बॅनर्स वैशिष्ट्यपूर्ण असत. आपल्या चित्रपटाच्या थीमनुसार ती असावीत आणि प्रेक्षकांसमोर चित्रपट पोहचण्याचा हादेखील एक महत्त्वाचा मार्ग आहे असे ते मानत. येथे दिग्दर्शक दिसतो असे कौतुकाने म्हणायला हवे. चित्रपट निर्मितीतील सर्वच अंगात रस घेतला पाहिजे हेच यातून सुचित होते.
त्या काळातील महत्वाचे माध्यम असलेल्या वृत्तपत्रातील जाहिरातीत विविध प्रकारची डिझाईन येऊ लागली. मग वाचनीय आणि चित्रपट हिताच्या कॅचलाईनही येऊ लागल्या. बॉम्बे पब्लिसिटी सर्विस या कंपनीचे सर्वेसर्वा वसंत साठे व एम.बी. सामंत त्या वाचनीय लिहित. जोडीला ए.डी. वालावलकर व अरविंद सामंत असत. वसंत साठे राज कपूरच्या चित्रपटाचे लेखक असल्याने त्यांच्याकडून आर.के. फिल्मच्या चित्रपटाच्या पोस्टरच्या कल्पना समजत. (हे वसंत साठे आणि काँग्रेस नेते वसंत साठे या दोन भिन्न व्यक्ती आहेत हे आजच्या डिजिटल पिढीतील व्हॉटस्अ‍ॅप युनिव्हर्सिटीत ओरडून सांगावे लागतेय.)
वसंत साठे यांची पटकथा असलेल्या व राज कपूर निर्मिती व दिग्दर्शित बॉबी ही प्रेमकथा आहे हे त्याच्या लेटरिंगमध्येही दिसतेय. दो आँखे बारह हाथ, मदर इंडिया, मुगल-ए-आझम, गंगा जमुना, प्यासा, कागज के फूल, झनक झनक पायल बाजे, नवरंग, काला पानी, नया दौर, दो बिघा जमीन, बंदिनी, गाईड, मुझे जीने दो अशा अनेक क्लासिक चित्रपटांची पोस्टर व होर्डींग्स अप्रतिम असत. आजही त्यांची कलात्मक पोस्टर लक्षवेधक ठरताहेत हे विशेष उल्लेखनीय आहे. चित्रपटाचे नाव आठवले तरी ही पोस्टर डोळ्यासमोर येणारच हे यश काही वेगळेच. हीदेखील एक चित्रपट संस्कृती.
आपल्या देशात मराठी व हिंदी यासह देशात लहान मोठ्या मिळून देशात जवळपास तीस प्रादेशिक भाषेत चित्रपट निर्माण होतात.., पण त्या संख्याबळाचा अभिमान तो कशाला हवा? आज पॅन इंडिया चित्रपट निर्मितीत एका भाषेतील चित्रपट अन्य चार पाच भाषेत डब होऊन अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचताहेत. आणि आजच्या रसिकांनीही व्यापक दृष्टिकोन ठेवला आहे हेही विशेषच. ओटीटी प्लॅटफॉर्मचे ते एक देणे आहे.
पूर्वी चित्रपट व्यावसायिकांची मक्का नाझ चित्रपटाची मुख्य इमारत होती (तेथील सातही मजल्यावर चित्रपट वितरकांची कार्यालये होती) तेथे गुरुवारी एक दृश्य हमखास दिसे, ते म्हणजे मुंबईतील अनेक चित्रपटगृहांची रंगवलेली पोस्टर वा होर्डींग्स रवाना होत. त्यासाठी हातगाडी, टेम्पो वा ट्रकचा वापर होई. चित्रपट उतरल्यावर ही सगळी रंगवलेली पोस्टर/होर्डींग्स पाठीमागील गोडाऊनमध्ये जमा होत. त्या काळात अनेक चित्रपट सेकंड रन (एखाद्या परिसरातील थिएटरमध्ये तोच चित्रपट पुन्हा), रिपिट रन (अनेक गाजलेले चित्रपट दोन तीन वर्षांच्या अंतराने पुन्हा प्रदर्शित होत) आणि मॅटीनी शो (देव आनंद, शम्मी कपूरचे अनेक म्युझिकल चित्रपट, तसेच काही जबरा संगीत असलेले भूतपट वा रहस्यपट नंतर सकाळच्या साडेअकराच्या खेळाला लागत) यासाठी हीच रंगवलेली पोस्टर/होर्डींग्स पुन्हा उपयोगी पडत. त्यांनाही रिपिट व्ह्यू होती असेच कौतुकाने म्हणूया. आज काळ खूपच पुढे गेलाय. आज दक्षिण भारतातील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांनी पब्लिसिटीचा फोकस जास्त डार्क ( खरंतर भडक) केलाय. अहे Aho vikramaarta हा चित्रपट ताजे उदाहरण. बाहुबली ने जे पेरलेय ते असे उगवलयं. चित्रपट प्रसिद्धीच्या अफाट व अचाट वाटचालीचा हा जणू ट्रेलर आपणासमोर मांडला आहे. पूर्वी माध्यमे कमी होती तरी चित्रपट प्रसिद्धी प्रभावी होती. आज मीडिया वाढलाय आणि चित्रपटाची पूर्वप्रसिद्धीही तेवढ्याच जोरशोर से
करावी लागतेय…

                                                                                                दिलीप ठाकूर- चित्रपट समीक्षक

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply