खारघर ः रामप्रहर वृत्त
फॅशन, उद्योगविश्वात हातमाग व खादी कपड्याला प्रचंड मागणी वाढली आहे. हातमाग कलेतल्या भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन-संवर्धन व्हावे आणि यातून नवनवीन उद्योजक तयार व्हावेत यासाठी आपल्यातील प्रत्येकाने स्वदेशी उत्पादने व खादीचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते बुधवारी (दि. 7) खारघरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळीने आधार दिला होता. या चळवळीचे स्मरण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 2015 साली केंद्र सरकारने घेतला. देशातल्या हातमाग विणकर समुदायाप्रती सन्मान व्यक्त करणे, त्यांच्या कलेचा गौरव आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात या क्षेत्राने दिलेल्या योगदानाची यथोचित दखल घेण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. याच अनुषंगाने उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या वतीने दहावा राष्ट्रीय हातमाग दिन मोठ्या उत्साहात खारघर येथे साजरा केला गेला.
या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व वर्षा ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वांना राष्ट्रीय हातमाग दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तर स्थानिक कारागिरांनी त्यांची उत्पादने उपस्थितांना दाखवून टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ कसे तयार केले हेही सादर केले. अशा कारागिरांना सन्मानचिन्ह व तुळशीचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले. नागरिकांना हातमागाचे महत्त्व कळावे या उद्देश्याने महिलांनी वॉकेथॉनचे आयोजन करून रॅम्पवॉकसुद्धा केले.
उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी, 2014पूर्वी 25 ते 30 हजार कोटींपर्यंत मर्यादित असलेला हा व्यवसाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर आज 1.50 लाख कोटींच्यावर पोहचला आहे. इतकी मोठी व्यवसायाची संधी व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्होकल फॉर लोकल या भावनेने देशवासी मनापासून स्वदेशी उत्पादने खरेदी करीत आहेत. या जनचळवळीत सर्वांनी सहभागी होऊन कुशल कामगारांचे मनोबल वाढवावे, असे सुचविले. सरचिटणीस चारुशीला घरत यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस संध्या शारबिद्रे, हातमाग संयोजिका वृषाली वाघमारे, सहसंयोजिका मोनिका महानवर, महिला मोर्चा पनवेल ग्रामीण अध्यक्ष कमला देशकर, पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, कर्जत अध्यक्ष नम्रता कांदळगावकर, खोपोली अध्यक्ष अश्विनी अत्रे, कामोठे अध्यक्ष वनिता पाटील, खारघर शहराध्यक्ष साधना पवार, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, नेत्रा पाटील, सोशल मीडिया महिला प्रदेश सहसंयोजिका बिना गोगरी, जिल्हा संयोजिका गायत्री परांजपे, सहसंयोजिका श्यामला सुरेश, जिल्हा संघटक नीता माळी, शिल्पा म्हात्रे, कोमल कोळी यांच्यासह भाजप जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, माजी नगरसेवक अॅड. नरेश ठाकूर, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …