Breaking News

बळीराजावर अस्मानी संकट

जोरदार पावसामुळे मराठवाड्यासह राज्यात पिकांचे मोठे नुकसान

रंगाबाद ः प्रतिनिधी
गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. या भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जीवित व वित्तहानी झाली आहे, तर शेतकर्‍यांची हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाल्याने आता पुढे करायचे काय, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
गुलाब वादळामुळे झालेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या अंगाला काटे रूतले आहेत. अनेक ठिकाणी खरीप पिकासह बागायती पिकांना फटका बसला आहे. नदीकाठच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. काही ठिकाणी पिके सडली आहेत. सोयाबीन, कापूस आदी खरीप पिकासह हळद, केळी, ऊस यांसारख्या बागायती पिकांचेही नुकसान झाले आहे.
दरम्यान, राज्यात झालेल्या नुकसानीचा आढावा राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी (दि. 29) पत्रकार परिषदेत घेतला. वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या चार महिन्यांत राज्यात झालेल्या पावसामुळे आतापर्यंत 17 लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी 170 ते 190 टक्क्यांपर्यंत पाऊस झाला. त्याचबरोबर 436 लोक बेपत्ता झाला होते. यापैकी 430 जणांचे मृत्यू झाले असून त्यांचे मृतदेह हाती आले, तर अद्याप सहा जणांचे मृतदेह मिळालेले नाहीत. याशिवाय 136 जण जखमी झाले आहेत.
सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 71 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद असून 26 लोक जखमी झाले आहेत. 97 जनावरांचा वीज पडून, तर 196 मोठ्या जनावरांचा या महिन्यात मृत्यू झाला. 31 जिल्ह्यांत या चार महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे 17 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. गुलाब चक्रीवादळामुळे दोन दिवसांत जो पाऊस झाला त्याची माहिती घेतली जात आहे.
तर दिवाळीला शेतकर्‍यांच्या घरासमोर चिता जळतील!
शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर तरुण शेतकरी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडताना दिसत आहेत. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील बोलठाण गावातील तरुण शेतकरी संदीप औताडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना या विदारक परिस्थितीचे वास्तव मांडले. ’कालच्या पावसाने, अद्रक, सोयाबीन, मका, बाजरी, भुईमूग, मूग, तूर, कपाशी, टोमॅटो पिकांचे अतोनात नुकसान झाले. आमच्या शेतात सगळीकडे पाणी तुंबलंय. शेतकर्‍यांनी कर्ज काढून उभे केलेले पीक डोळ्यासमोर पाण्यात गेले. लोकांची शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली. शेतकर्‍यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई न मिळाल्यास दिवाळीला शेतकर्‍यांच्या घरी दिवा नाही, तर चिता पेटलेल्या दिसतील, असे संदीप औताडे यांनी म्हटले आहे.
पोकळ आश्वासने नको तर तातडीच्या मदतीची गरज -फडणवीस
मुंबई ः गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत जोरदार पाऊस पडला असून त्यामुळे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे, असे राज्य सरकारला उद्देशून म्हटले आहे.
राज्यात विशेषतः मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळे आणि पुराची कोकणात अद्याप मदत मिळाली नाही, असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. प्रचंड प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांमुळे शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे, असे आवाहनदेखील फडणवीस यांनी आपल्या ट्विटमधून केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply