Breaking News

विद्यार्थ्यांनी सुट्टीत करा कौशल्यवर्धन

जगात चिरंतन किंवा शाश्वत काहीही नसते. कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आणि देदीप्यमान यश मिळवण्यासाठी जी बाब खर्या अर्थाने आवश्यक आहे ती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ती म्हणजे पैसा नव्हे तर विविध कौशल्ये आत्मसात केलेली माणसे ऊर्फ स्किल्ड मॅनपॉवर.

अलीकडील काळातील बेरोजगारीचे वास्तव लक्षात घेतले तर असे दिसून येईल की, यातील अनेक बेरोजगारांकडे बाजारपेठेला आवश्यक असणारी, उद्योगजगतांकडून मागणी असणारी कौशल्ये नाहीत. परिणामी, हातात डिग्रीचा कागद असूनही नोकरी मिळत नाही. त्यामुळेच आपल्याकडे कौशल्य विकासासाठी राष्ट्रीय पातळीवर योजना राबवाव्या लागतात. या योजनांमधून देशातील तरुणांमध्ये कौशल्ये विकसित व्हावीत, त्यातून रिकाम्या हातांना काम मिळावे आणि दुसरीकडे उद्योगजगतालाही कुशल उमेदवार मिळावेत असे तिहेरी उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.

माझ्या दृष्टीने आयटी या शब्दप्रयोगाचा अर्थ आहे इंडियाज् टॅलेंट. कौशल्यवृद्धीसाठी लागणारा वेळ आता म्हणजे उन्हाळी सुट्टीत असतोच. दर वर्षी उन्हाळी सुट्टीत एक नवीन गोष्ट शिकणे हा संकल्प जर आपण वयाच्या 12 व्या वर्षी केला तर पदवीधर होईपर्यंत आपल्याकडे किमान दहा कौशल्यांचा साठा झालेला असेल. हीच गुंतवणूक नंतर आपले यशस्वी करिअर घडवू शकते.

जागतिकीकरणाचे फायदे हवे असतील तर आपल्या मुलामुलींना जागतिक पातळीवर वापरल्या जाणार्या भाषा शिकवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे लागेल. आपल्याकडील युवकवर्गापर्यंत जागतिक पातळीवरच्या रोजगारांची चाहूल पोहोचली की ते इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच यांसारख्या भाषा शिकायला फक्त तयार होतील असे नव्हे तर उत्सुक बनतील. यासाठी प्रचंड प्रमाणावर शिक्षक लागतील हे खरे आहे. परंतु, नेमक्या याच ठिकाणी आपण ई-शिक्षण, आभासी शाळा (व्हर्च्युअल क्लासरूम) अशा बाबींचा वापर करू शकतो! माहिती तंत्रज्ञान-सक्षमित शिक्षणपद्धतीचा आपणांस मोठा उपयोग होणार आहे.

व्यक्तिसापेक्ष अंगभूत कौशल्यांचा विकास करण्याकडे आपण खरोखरीच युद्धपातळीवर लक्ष दिले तर भविष्यात आपला देश फार वेगळा दिसेल. मात्र, त्यासाठी सर्वांनाच शिक्षणाबाबतची आपली संपूर्ण विचारपद्धती पूर्णपणे बदलावी लागेल. आजच्या शिक्षणाने विद्यार्थी फक्त घोकंपट्टी आणि मार्काच्या चरकात पिळून निघत आहेत व पुस्तकातले किडे बनत आहेत. हे ताबडतोब थांबवून त्यांना ते विषय खरोखरी कितपत समजले आहेत हे तपासणे आवश्यक आहे. कारण नवीन प्रकारच्या व्यवस्थेमध्ये, इंटरनेटसारख्या माध्यमांतून जग जवळ आल्याने, बुद्धिमत्तेचे निकषच बदलू लागले आहेत. ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करता येण्यावर जास्त भर दिला जात आहे व येत्या काळात अनावश्यक माहितीच्या घोकंपट्टीला पूर्णपणे फाटा मिळणार आहे. पुढील दशकामध्ये आपणा सर्वांच्या खासगी तसेच कामाच्या ठिकाणच्या जीवनशैलीत मोठे बदल होणार आहेत.

विसाव्या शतकात जे नीतिनियम किंवा धोरणे लागू होती ती भविष्यकाळात कामास येणार नाहीत. त्यामुळे ‘अनुभवी’ असण्याची संकल्पनाच बदलणार आहे. म्हणजे असे एखादे काम प्रभावीपणे करून दाखवणार्या व्यक्तीस, पारंपरिक अर्थाने, त्या कामासंबंधीचा खूप अनुभव असेलच असे नाही. व्यवहारज्ञान, प्रभावी संवाद साधण्याचे कौशल्य, समूहामध्ये काम करण्याची तयारी व क्षमता या व अशा बाबींना आजच्या तुलनेमध्ये असाधारण महत्त्व येणार आहे. वेग, नवकल्पना, मूल्यवर्धन आणि बदल आत्मसात करणे हे आजच्या घडीचे मंत्र आहेत.

व्यावसायिक शिक्षण पद्धती व कौशल्यावर आधारित ज्ञानप्राप्ती हेच आगामी यशाचे सूत्र आहे. जे भूतकाळात घडलं ते भविष्यात नक्की घडणार नाही. उपलब्ध वेळ हे आपले भांडवल असा विचार सर्व विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. परीक्षेनंतरची सुट्टी इंटर्नशिप (व्यावसायिक अनुभव प्राप्ती) व नवीन प्रमाणपत्रे मिळवणे हा मार्ग जर विद्यार्थीदशेत चोखाळला तर मुलाखतीच्या वेळी आपला बायोडेटा अतिशय वजनदार व रोजगारक्षम होईल. फ्रेशर हा शब्द शैक्षणिक कोषातून हद्दपार करायची वेळ आली आहे. व्यावसायिक प्रकल्प व कार्यनुभव गांभीर्याने घेतले पाहिजेत. विद्यापीठ, उद्योग, महाविद्यालये व शिक्षक या सर्व घटकांनी एकत्र येऊन ही पद्धत राबवली पाहिजे तरच आय टी म्हणजे इंडियन टॅलेंट ही व्याख्या जग स्वीकारेल.

-डॉ. दीपक शिकारपूर

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply