कर्जत : बातमीदार
तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील आषाणे आदिवासी वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. येथील आदिवासी बांधवांना पिण्याचे पाणी घरी नेण्यासाठी करावी लागणारी धडपड लक्षात घेऊन उमरोलीचे सरपंच आणि अन्य पदाधिकार्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आषाणे वाडीमध्ये बुधवार (दि. 22) पासून पाण्याचा ट्रँकर सुरू केला.
प्रसिद्ध आषाणे धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेल्या आषाणे आदिवासी वाडीमधील विहीर आटली आहे. त्यामुळे 50 घरांची लोकवस्ती असलेल्या या वाडीतील आदिवासी बांधवांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी सुमारे दीड ते दोन किलोमीटर लांब असलेल्या सागाचीवाडी किंवा सावरगाव वाडीकडे जावे लागते. येथील महिलांसह पुरुषांची पाण्यासाठी होणारी पायपीट लक्षात घेऊन मंगळवारी (दि. 21) उमरोली ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी वाडीमध्ये जाऊन पाहणी केली. उमरोली येथून डोंगर चढून सरपंच सुनीता बुंधाटे, उपसरपंच विशाखा दाभणे, ग्रामपंचायत सदस्य ठमी सांबरे आणि ग्रामविकास अधिकारी विनोद चांदोरकर तेथे पोहचले. त्यासाठी त्यांना उमरोली गावातून दीड तास चालत आषाणे वाडी गाठावी लागली. त्यांनी वाडीमध्ये बांधण्यात आलेल्या घरकुलांची पाहणी केल्यानंतर तेथील विहीर पाहिली. या विहिरीने तळ गाठल्याचे पाहून सरपंच बुंधाटे यांनी, ‘ उमरोली ग्रामपंचायत पाण्याचा ट्रँकर पाठवून देईल‘, असे आश्वासन दिले. त्यानुसार बुधवारी आषाणे वाडीत पहिला ट्रँकर पोहचला. यावेळी ग्रामस्थ दिपक बुंधाटे, समीर दाभणे, नामदेव सांबरे, हिरु पारधी, भाऊ होले, विष्णू सांबरी, पदु सांबरी आदी उपस्थित होते. पावसाळा सुरू होईपर्यंत दररोज पिकअप गाडीमध्ये सिंटेक्स टाकीच्या सहाय्याने आषाणे वाडीत पाणी पोहचविले जाणार आहे.