Breaking News

नाण्याचा माळ शाळेला इमारत नाही, शिक्षिकेचीही चार महिन्यांपासून दांडी, रायगड जि. प.चा प्रताप

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या नाण्याचा माळ येथे असलेली रायगड जिल्हा परिषदेची शाळा स्वतःची इमारत नसल्याने गेली अनेक वर्षे एका घरात भरविली जात आहे. तर पनवेल येथून बदली होऊन आलेल्या शिक्षिका या शाळेत गेल्या चार महिन्यांपासून आल्याच नाहीत. दरम्यान, शाळेच्या इमारतीचा आणि शाळेवर मंजूर पटानुसार असलेला शिक्षक न आल्यामुळे आदिवासी, धनगर समाजाच्या ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

माथेरानच्या डोंगर रांगेत दुर्गम भागात नाण्याचा माळ ही धनगर समाजाची वस्ती असलेले वाडी आहे. रायगड जिल्हा परिषदेने नाण्याचा माळ येथे इयत्ता पहिला ते चौथीपर्यंतची शाळा मंजूर केली आहे. 2013 पासून नाण्याचा माळमध्ये ही शाळा भरत असून, तेथे 23 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या प्राथमिक शाळेसाठी कर्जत पंचायत समिती शिक्षण विभागाने दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे. मे 2019 रोजी त्यातील एका शिक्षकाची बदली झाल्यानंतर जिल्हा परिषदने केलेल्या शिक्षक समायोजनमध्ये पनवेल येथील ज्योती बाळासाहेब कोलते यांना नाण्याचा माळ ही शाळा मिळाली. मात्र त्या नाण्याचा माळ येथील शाळेत सप्टेंबर 2019मध्ये हजर झाल्या आणि त्यांनतर आतापर्यंत फक्त तीन दिवस आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, मुख्याध्यापक मोरे यांना पहिली ते चौथीपर्यतच्या मुलांना शिकविण्याची कसरत करावी लागत आहे.

 या गावातील आदिवासी आणि धनगर समाजाच्या ग्रामस्थांनी कर्जत पंचायत समितीमध्ये जाऊन शिक्षक येत नसल्याबद्दल वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. तर जानेवारी महिन्यात नवीन शिक्षक किंवा शाळेत नियुक्ती झालेल्या ज्योती कोलते या हजर न झाल्यास शाळा बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी बाळाजी पुरी यांना दिलेल्या निवेदनात बाळा सांबरी यांनी दिला आहे.

येथील जिल्हा परिषद शाळेला अद्याप स्वतंत्र इमारत नाही. 2013 पासून तेथील ज्येष्ठ ग्रामस्थ झिमा आखाडे यांच्या घरी शाळा भरवली जात आहे. शाळेच्या इमारतीसाठी तेथील दळी भूखंड देण्याची तयारी ग्रामस्थांनी दाखवली होती. मात्र कर्जत पंचायत समितीच्या सर्व शिक्षा अभियानने आतापर्यंत या शाळेच्या इमारतीसाठी मंजुरी किंवा निधी मंजूर केलेला नाही. शाळेची स्वतःची इमारत व्हावी आणि महिला शिक्षिके ऐवजी पुरुष शिक्षक देण्याची मागणी करणारे निवेदन ग्रामस्थांनी पंचायत समितीला दिले आहे. त्या निवेदनावर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष झिमा कोंडू आखाडे, ग्रामस्थ नागेश गोरे, योगिता गोरे, शोभा आखाडे, लक्ष्मण गोरे, राजेश गोरे, बाळा संबरी यांच्यासह सर्व 40 ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

कर्जत पंचायत समितीकडे वेळोवेळी मागणी करुनही येथील प्राथमिक शाळेला शिक्षक दिला जात नाही. या महिन्यात शिक्षक न आल्यास आम्ही शाळा बंद करू

-बाळा सांबरी, ग्रामस्थ,

नाण्याचा माळ, ता. कर्जत.

नाण्यांचा माळ येथील शाळेत आंतर बदली होऊन आलेल्या ज्योती कोलते या शिक्षिका हजर झाल्यानंतर पुन्हा शाळेत आल्या नाहीत. त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना दिला असून, त्या शाळेत आणखी एक शिक्षक द्यावा, असेही सूचित केले आहे.

-शरद म्हसे, केंद्रप्रमुख

नाण्यांचा माळ येथे बदली होऊन आलेल्या शिक्षिकेने हजर व्हावे, असे निर्देश दिले आहेत. त्या हजर न झाल्यास आम्ही जिल्हा परिषदेकडे त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करणार आहोत. -बाळाजी पुरी, गटविकास अधिकारी, पं.स. कर्जत

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply