
वेगवेगळ्या दिशेला तोंड असणार्या पक्षांचे सरकार असेल, तर काय होते याचा प्रत्यय महाविकास आघाडी सरकारकडे पाहिल्यावर सहजपणे येतो. वास्तविक, तीन पक्षांनी मिळून कोरोना संकट तसेच अन्य प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी सर्व ताकद लावणे अपेक्षित होते, मात्र सगळाच सावळागोंधळ आहे. चार महिन्यांनंतरही देऊळ बंद त्याच गोंधळाचा एक भाग आहे.
देशात अनलॉक अंतर्गत अनेक गोष्टींना अटी व शर्थी घालून टप्प्याटप्प्याने परवानगी देण्यात येत आहे. ते योग्यच आहे. कारण हातावर हात ठेवून किती दिवस बसणार? कोविड-19 संसर्गाच्या भीतीने घरी बसून राहिले तर पोटाची खळगी न भरता तोच जीव वाचवणार तरी कसा? म्हणूनच नियमावली घालून देत विविध व्यवहार सुरू करण्याकडे केंद्र सरकारचा कल आहे. राज्य सरकारनेही ’मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत निर्बंध हटविले आहेत. आता राज्यात जर मांस, मदिरा व इतर गोष्टी सुरू झाल्या आहेत तर मग भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे, देवस्थाने, धार्मिक स्थळे का बंद, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे. याच मुद्द्याकडे भाजपने धार्मिक, आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळींसह घंटानाद आंदोलन करून राज्य सरकारचे वेधले आहे. या आंदोलनाला राज्यभरात उत्तम प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीत अनेक महापुरुषांनी आपले जीवन रंजल्या-गांजलेल्या लोकांसाठी वाहिले. भजन, कीर्तन, प्रवचनातून निष्काम भक्तीमार्ग दाखविण्याबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन, प्रबोधन केले. अशा राज्यातील मंदिरे बंद आज चार महिन्यांनंतरही बंद असल्याने संत-महंत, आचार्य, धर्माचार्य तसेच धार्मिक, आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळींमध्ये संताप व्यक्त होत आहे. महाविकास आघाडी सरकार भजन, पूजन करणार्यांवर गुन्हे दाखल करीत आहे. ‘भाविक-भक्तांना जेल आणि गुन्हेगारांना बेल’ असा ठाकरे सरकारचा कारभार सुरू आहे. केंद्र सरकारने 4 जून रोजी मंदिरे खुली करण्यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून, त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरूदेखील झालेली आहेत. महाराष्ट्रातही सामाजिक अंतर राखून तसेच आवश्यक नियम, अटी, शर्तींसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करू देण्याची आग्रही मागणी भाविक-भक्तांकडून होत आहे, मात्र हरीला बंदिस्त करून ठाकरे सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले आहे. या निद्रिस्त ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धार्मिक, आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी तसेच देवस्थान, तीर्थक्षेत्र येथील उदरनिर्वाह निगडित असलेले व्यावसायिक शनिवारी मंदिरे, धार्मिक स्थळांसमोर एकवटले. भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्तेही देवळांसमोर जमले आणि या सर्वांनी सामाजिक अंतरांचे पालन करून घंटानाद आंदोलन केले. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेले आघाडी सरकार आता तरी जागे होईल, अशी अपेक्षा आहे. या सरकारमध्ये निर्णयक्षमताच नाही. खरे तर दोन्ही काँग्रेसमध्ये असलेल्या मंत्र्यांना सरकार चालविण्याचा दांडगा अनुभव आहे. तो पाहता अशा परिस्थितीत त्यांनी आपला अनुभव पणास लावून कोरोना प्रतिबंध तसेच विविध समस्यांची सोडवणूक करून राज्याची गाडी रूळावर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे क्रमप्राप्त होते, मात्र यांच्यात इच्छाशक्ती नाही. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव अशी त्यांची अवस्था आहे. मग देव तरी यांना कशी साथ देईल..!