अलबेला 1951चा पिक्चर. सी. रामचंद्र यांच्या संगीतातील भोली सुरत दिल के खोटे, शोला जो भडके दिल मेरा धडके, श्याम ढले खिडकी तले ही गाणी हिट होता होता डॉ. भडकमकर मार्गावरील (तेव्हाचा लॅमिंग्टन रोड) इंपिरियल थिएटरमधील गर्दी वाढत वाढत गेली आणि मा. भगवान विलक्षण सुखावले. या चित्रपटाच्या यशाने मा. भगवान आणि अलबेला या यशाच्या एकाच नाण्याच्या दोन
बाजू ठरल्या…
ही गोष्ट जुनी म्हणून तेथेच संपली असे अजिबात समजू नका. या चित्रपटाला साठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त याच इंपिरियल थिएटरमध्ये ‘अलबेला’च्या खास खेळाचे आयोजन करून जवळच्याच एका हॉलमध्ये फिल्म दीवाने मनसोक्त गप्पांसाठी जमले.
…तर साठच्या दशकात अधूनमधून फक्त एका आठवड्यासाठी असे म्हणतच अलबेला एखाद्या चित्रपटगृहात प्रदर्शित होई. सत्तरच्या दशकाच्या मध्यास तर धमाल आली. चित्र खजिना या चित्रपट वितरण संस्थेच्या वतीने पुन्हा प्रदर्शित केलेला अलबेला हाऊसफुल्ल गर्दीत एन्जॉय केला जावू लागला. एव्हाना रसिकांची बरीच पुढची पिढी आली होती. ती आणि मागची पिढी मिळून ‘अलबेला’च्या गाण्यावर ताल धरू लागले. एकदा लोकप्रिय झालेली गाणी सर्वकालीन लोकप्रियच असतात. त्या काळात रेडिओ, लाऊडस्पीकर, इराणी हॉटेलमधील ज्युक्स बॉक्स, टेपरेकॉर्डर याच माध्यमातून गाण्यांचा प्रवास सुरू असे. ’अलबेला’ची गाणी त्याही पलिकडे पोहचली. गोपाळकाला, गणपती विसर्जन यातील कच्चीबाजात भोली सुरत दिल के खोटे सतत वाजत वाजत एका पिढीतून पुढील पिढीत जात राहिले आणि अलबेला रिपीट रनला येताच धो धो चालला. एकेक करत अनेक चित्रपटगृहात प्रदर्शित होत राहिला.
पिक्चरच्या दुनियेतील अशा काही रंजक व यशाच्या गोष्टी रसिकांची पिढी मुद्रित माध्यमातून डिजिटल युगात आली तसाच त्या गोष्टी यू ट्यूब चॅनेलपर्यंत प्रवास करताहेत. माहितीच्या स्फोटात हा रंग वेगळाच.
आज मल्टीप्लेक्समध्ये काही जुने (तेही फार जुनेही नाहीत हो) चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत असतानाच ओरडून सांगावेसे वाटते, हे कल्चर तर साठ आणि सत्तरच्या दशकातील आणि त्यात काही चित्रपट तर रिपीट रनचे हुकमी.
मेरा नाम जोकर (1970) फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच पडला पडल्याची (की पद्धतशीर पाडला?)चा किस्सा कायमच गाजतो. दोन मध्यंतरचा जोकर आठवडाभरात एका मध्यंतरचा केला. काही आठवड्यातच जोकरची रिळे थिएटरमधून गोडाऊनमध्ये गेली (मुंबईत मेन थिएटर नॉव्हेल्टी), पण शो संपला नाही की थांबला नाही. काही वर्षातच जोकर कधी कुठे रिपीट रनला तर कुठे मॅटीनी शोला रिलीज होत होत रसिकांचा असा काही प्रतिसाद मिळवण्यात यशस्वी ठरला… सहज एक आठवण सांगतो. रणधीर कपूर दिग्दर्शित हीना (1991)चा मुंबईवरील आम्हा चित्रपट समीक्षकांसाठीचा खेळ आर.के. स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये आयोजित केला होता आणि शो संपल्यावर स्टुडिओतच पार्टी. त्या पार्टीत ‘मेरा नाम जोकर’चा विषय निघताच रणधीर कपूर आम्हा सिनेपत्रकारांना म्हणाला, मेरा नाम जोकर हा आर.के. फिल्मच्या इतिहासातील सर्वाधिक उत्पन्न मिळवणारा चित्रपट ठरला. लोकांनी त्याला सुरुवातीस फ्लॉप म्हटलं, पण त्यानंतर जेव्हा जेव्हा रिपीट रनला जोकर रिलीज झाला तेव्हा उत्तम प्रतिसाद मिळवला… तेव्हा ‘हीना’च्या समिक्षकेपेक्षा ‘जोकर’च्या अशा यशाची बातमी मोठी होती.
रिपीट रन चित्रपटाच्या यशोगाथेत के. असिफ दिग्दर्शित मुगल-ए-आझम (1960) हा सर्वाधिक वेळा पुन्हा पुन्हा प्रदर्शित झालेला चित्रपट ठरावा. मला आठवतंय, सत्तरच्या दशकात मुंबईत तो सतत कुठे ना कुठे एका आठवड्यासाठी पुन्हा पुन्हा प्रदर्शित होत असे. मीदेखील असाच तो रिपीट रनला नाझ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असता आवर्जून गेलो. तोपर्यंत त्याच्यावरील लेख वाचून वाचून तो डोळ्यासमोर होता. त्या काळातील मुद्रित माध्यमातून फ्लॅशबॅक, यादों की बारात, गुजरा हुआ जमाना, घुंघट के पट खोल, वो दिन याद करो अशा सदरांतून जुन्या चित्रपटांची चौफेर आणि भरपूर माहिती, वैशिष्ट्य वाचायला मिळत आणि त्यातूनच अनेक जुने चित्रपट कधी बरे पाहतोय असे होई.
चित्रपती व्ही.शांताराम दिग्दर्शित ‘झनक झनक पायल बाजे’ (1955)च्या रिपीट रनची गोष्ट खूपच वेगळी. हा चित्रपट फर्स्ट रननंतरही रिपीट रनला प्रदर्शित होत होताच आणि आशय, दिग्दर्शन व गीत संगीत व नृत्य क्लासिक असल्यानेच चित्रपटाला पुन्हा पुन्हा प्रतिसाद मिळत राहिला. अशातच ऐंशीच्या दशकाच्या मध्यास प्लाझाचे नूतनीकरण करण्यात आले आणि पुन्हा चित्रपटगृह सुरू करताना झनक झनक पायल बाजे प्रदर्शित करण्यात येताच रसिकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाल्याने चित्रपटाने बरेच आठवड्यांचा मुक्काम केला. दर्जेदार कलाकृती कधीच कालबाह्य होत नसते, ती आपले सामर्थ्य रिपीट रनलाही दाखवून देतेच आणि झनक झनक पायल बाजे पुन्हा पुन्हा पाहणे कोणाला आवडणार नाही म्हणा.
नवीन शतकाच्या सुरुवातीस आधुनिक तंत्रज्ञानाने के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल-ए-आझम’ (1960) रंगीत करून पुन्हा 2004च्या दिवाळीत थाटात रिलीज करतानाही त्याची प्रिंट हत्तीवरून चर्चगेटच्या इरॉस थिएटरला आणली (5 ऑगस्ट 1960 रोजी मराठा मंदिर चित्रपटगृहातही अगदी अशीच ब्लॅक अॅण्ड व्हाईट ’मुगल-ए-आझम’ची प्रिंट हत्तीवरून आणली होती. त्या वेळेस चित्रपटातील देखण्या काचमहालातील मधुबालावरचे प्यार किया तो डरना क्या हे एकमेव नृत्य गीत रंगीत होते). आम्हा चित्रपट समीक्षकांना इरॉसच्या फर्स्ट डे फर्स्ट शोचे तिकीट दिल्याने मागील व पुढील पिढीसोबत पुन्हा मुगल-ए-आझम पाहिला. हा चित्रपट सत्तरच्या दशकापासून असंख्य वेळा रिपीट रनला प्रदर्शित झाला. मेहबूब खान दिग्दर्शित मदर इंडिया, विजय आनंद दिग्दर्शित गाईड, तिसरी मंझिल, राज खोसला दिग्दर्शित वो कौन थी, ओ.पी. रल्हन दिग्दर्शित फूल और पत्थर, यश चोप्रा दिग्दर्शित वक्त हे रिपीट रन वा मॅटीनी शोला वारंवार येत आणि चार-पाच वेळा पाहिलेले असले तरी पुन्हा पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणे होई.
मराठीत दादा कोंडके यांचे चित्रपट सर्वकालीन हिट पहिल्या रनला धो धो चालले तसेच रिपीट रनलाही त्यांना हाऊसफुल्ल गर्दी होत राहिली. अनेकदा तरी भारतमाता चित्रपटगृहावर जावे तर आंधळा मारतो डोळा, तुमचं आमचं जमलं, मला घेऊन चला असा दादांचा कोणता ना कोणता चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्याचे दिसे आणि हमखास मनोरंजनाची हमी म्हणून तिकीट काढून आत जाऊन बसून मग फ्रेश होऊन बाहेर पडायचो.
रिपीट रन वा मॅटीनी शो चित्रपटांची वैशिष्ट्य अनेक. जंजीर, नमक हराम, दीवारच्या यशाने अमिताभ बच्चन नावाला वलय आणि वळण आले आणि त्याचे सुरुवातीचे संजोग, प्यार की कहानी, रास्ते का पत्थर, बंधे हाथ असे अनेक जुने चित्रपट आता रिपीट रनला प्रदर्शित केले. आता ‘परवाना’च्या पोस्टरवर अमिताभ मोठा (त्यात तो खलपुरुष असतो) आणि नवीन निश्चल व योगिता बाली छोटे होते. पहिल्यांदा रिलीज होताना याच परवानाच्या पोस्टरवर अमिताभ कुठे तरी कोपर्यात असे वा नसेदेखील. यशाची हीच तर गंमत असते. ती अनेक समिकरणे/कधी नातेसंबंध बदलून टाकते.
आपल्या चित्रपटाचे जग अनेक प्रकारच्या लहान मोठ्या गोष्टीत रमलेले. राज खोसला दिग्दर्शित प्रेम कहानी आणि शक्ती सामंता दिग्दर्शित मेहबूबा या चित्रपटाना रसिकांनी नाकारले आणि खर्या अर्थाने राजेश खन्नाची सद्दी संपली. या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीत तो कायम म्हणायचा, माझे दिवस परत येतील, पण अमिताभचा सूडनायक तरुण पिढीला आपलासा वाटत होता. प्रेम कहानी व मेहबूबा दोन्हीची गाणी आजही लोकप्रिय. याचा फायदा काय झाला माहित्येय? हे चित्रपट रिपीट रन वा मॅटीनी शोला आले रे आले त्यातील गाणी पाह्यला हमखास गर्दी. दर्जेदार गीत संगीत चित्रपटाला कायमच पुढील पिढीत नेत राहते.
रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हा रिपीट रनमध्येही विक्रमी. सत्तर एम.एममध्ये मिनर्व्हात अनेकांनी अनेकदा अनुभवला. रिपीट रनला पस्तीस एम.एममध्येही कुठे कुठे पाहिला. अनेक वर्षांनी त्यावर सोपस्कार करून तो थ्रीडी (त्रिमिती) करून मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित केला. मी या तांत्रिक अनुभवासाठी आवर्जून जुहूच्या मल्टीप्लेक्समध्ये गेलो. गब्बरचा धाक कायम होता आणि आता पन्नासाव्या वर्षांत प्रवेश केल्याबद्दल रिगल चित्रपटगृहात एका खास खेळाचे आयोजन केले असता मी रिगलवर पोहचेपर्यंत शोले हाऊसफुल्ल. एक रसिक मला म्हणाला, थिएटरमध्येच मी शोले एकशेदहा वेळा पाहिला… ऐकून मला वाटलं, अशा फिल्म दीवान्यांनीच आपल्या देशात चित्रपट जगवला, वाढवला, जगवला. त्यांनी आपल्या देशातील चित्रपटावर निस्सीम प्रेम केले. शोले अनेकदा रिपीट रनला पडद्यावर आला आणि पुन्हा पुन्हा एन्जॉय केला गेला. एवढं ‘शोले’त पाहण्यासारखे काय आहे असे म्हणणारे बरेच असले तरी त्यांचे ऐकतोय कोण?
रिपीट रन, मॅटीनी शोचा इतिहास खूपच रंजक व अनेक आठवणी, अनुभव असणारा. आज मल्टीप्लेक्सला नवीन चित्रपटांचा प्रवाह आटलाय म्हणून जुने चित्रपट प्रदर्शित होताहेत इतकेच. त्यापेक्षा प्रत्येक मल्टीप्लेक्समधील एक स्क्रीन फक्त आणि फक्त अगदी ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटाच्या काळापासून ते 2000 सालापर्यंतचे जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यासाठी ठेवावा. चित्रपट संस्कृतीत कायमच जुन्या चित्रपटांचे आकर्षण कायम राहिलयं. तो खेळ यापुढेही राहू देत…
– दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …