Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबाचा ‘रयत’कडून गौरव

विद्यमान शैक्षणिक वर्षात सात कोटी 11 लाख रुपयांची देणगी

सातारा ः रामप्रहर वृत्त
समाजकारणाला महत्त्व देत सामाजिक दायित्व बजावणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार थोर देणगीदार, लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांनी विद्यमान शैक्षणिक वर्षात रयत शिक्षण संस्थेला सात कोटी 11 लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते रविवारी (दि. 22) कर्मवीर जयंतीनिमित्त समारंभपूर्वक हृद्य गौरव करण्यात आला.
बहुजनांच्या शिक्षणाचे वटवृक्ष रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 137वा जयंती सोहळा सातारा येथे कर्मवीर भूमीत अनेक मान्यवर व हजारो रयत सेवकांच्या उपस्थितीत झाला.
थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांनी रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी सातत्याने भरीव मदत करून या संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच मोलाचा हातभार लावला आहे. आजपर्यंत 100 कोटींहून अधिक रुपयांची देणगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या संस्थेला दिली आहे. कर्मवीर अण्णांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांचा शैक्षणिक वारसा जपण्याचे अखंड कार्य लोकनेते रामशेठ ठाकूर करीत आहेत. त्यांनी विधायक कामाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी मुक्तहस्ते मदत केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात असलेल्या विद्यालयांना उभारी देण्याचे काम केले.
विद्यमान शैक्षणिक वर्षात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दोन कोटी 65 लाख रुपये, त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी तीन कोटी 91 लाख रुपये, तर सुपुत्र परेश ठाकूर यांनी 55 लाख रुपयांची देणगी रयत शिक्षण संस्थेला दिली आहे. त्याबद्दल त्यांचा या वेळी संस्थेच्या वतीने सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले तसेच सात्रल विद्यालयाच्या विकासासाठी 50 लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल या शाखेच्या वतीनेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.
चांगले विचार स्वतः आणि इतरांना घडविण्याचे काम करते. जन्माला येताना आणि मृत्यूनंतर खाली हात जावे लागते. माणुसकी आणि विचार अमर असतात. शैक्षणिकदृष्ट्या समाजाच्या विकासासाठी सर्वांनी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणे गरजेचे आहे आणि याच सामाजिक भावनेतून लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीय कार्य करीत असतात. रयत शिक्षण संस्था आणि ठाकूर कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी कर्मवीर अण्णांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे काम रयतसेवक म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर सतत करीत आहेत. स्वतःची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ही शैक्षणिक संस्था असतानाही त्यांचे रयत शिक्षण संस्थेवर असलेले जीवापाड प्रेम कायम अधोरेखित झाले आहे. रयत शिक्षण संस्थेला मातृसंस्था मानून सदैव रयतेच्या विकासासाठी कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संपूर्ण देशात आदर्श घालून दिला आहे. संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यामुळे संस्थेचे आधारस्तंभ असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबाचा सन्मान करून त्यांच्याप्रती आभार व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संघटक डॉ. अनिल पाटील, व्हाइस चेअरमन भगीरथ शिंदे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू-पाटील, सचिव विकास देशमुख, आमदार बाळसाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार सुमन पाटील, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, वैशाली देशमुख, जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, शुभांगी घरत, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के यांच्यासह मॅनेजिंग कौन्सिल व जनरल बॉडी सदस्य, रयतसेवक उपस्थित होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयतसेवकांना मार्गदर्शन केले तसेच संस्थेच्या कार्याचा आणि पुढील वाटचालीचा आढावा मांडला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पनवेल तालुक्यातील गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाने यंदाचे कर्मवीर पारितोषिक पटकावले असून त्यांचाही या वेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply