Breaking News

मतमोजणी केंद्रात अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी जयंत पाटलांसह चार आमदारांवर गुन्हा

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना मातमोजणी केंद्रात बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकारणी रायगड जिल्ह्यातील चार आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

23 मे रोजी अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील जिल्हा  क्रीडा संकुलामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होती. ही मतमोजणी पूर्ण झालेली नसताना शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार  पंडित पाटील, आमदार धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे यांनी अनधिकृतपणे मतमोजणी केंद्रात प्रवेश केला. निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी या चारही आमदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मतमोजणी परिसरात निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राद्वारेच प्रवेश दिला जात होता. यासाठी ओळखपत्र दाखवून तपासणी करून आत सोडले जात होते. ज्यांच्याकडे ओळखपत्रे नव्हती, त्यांना प्रवेश दिला जात नव्हता.

गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शेकापचे आ. जयंत पाटील, आ. पंडित पाटील (अलिबाग), आ. धैर्यशील पाटील (पेण) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अनिकेत तटकरे (सुतारवाडी) हे चार जण मतमोजणी केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले. या वेळी या आमदारांकडे निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्रही नव्हते. बंदोबस्तासाठी असलेले अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी डी. बी. निघोट यांनी चारही आमदारांना ओळखपत्र नसल्याने आत जाण्यास मज्जाव केला असता आम्ही आमदार आहोत, असे सांगून पोलीस अधिकार्‍यांच्या बोलण्याकडे व सूचनांकडे दुर्लक्ष करून त्यांनी अनधिकृतपणे मतमोजणी केंद्रात प्रवेश केला.

याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील, आमदार धैर्यशील पाटील आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या विरोधात भादंवि कलम 188प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तोडकरी करीत आहेत.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply